`देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान...`; मालदीव विरुद्ध भारत वादावर मोहम्मद शमीचा शाब्दिक यॉर्कर
Mohammed Shami On India Vs Maldives: सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यासारख्या माजी क्रिकेटपटूंनंतर आता विद्यमान खेळाडूही या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.
Mohammed Shami On India Vs Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरुन केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर भारत विरुद्ध मालदीव असा संघर्ष सुरु झाला आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावर भारताने तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर मालदीवने तातडीने कारवाई करत वागग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना निलंबित केलं आहे. मात्र यानंतरही हे प्रकरण शांत होण्याची शक्यता दिसत नसून अनेक भारतीय सेलिब्रिटींनी या प्रकरणावरुन मालदीवसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. या सेलिब्रिटींच्या यादीत भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचीही भर पडली आहे.
शामी काय म्हणाला?
मालदीवमधील मंत्र्यांच्या विधानानंतर सलमान खान, अमिताभ बच्चन, कैलास खेर यासारख्या मनोरंजन सृष्टीतील सेलिब्रिटींबरोबरच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुरेश रैना आणि व्यंकटेश प्रसाद यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मोहम्मद शामीनेही एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना मालदीव प्रकरणावर भाष्य केलं आहे. शामीने भारतीय बेटांवरील पर्यटनाला चालना दिली पाहिजे असं म्हटलं आहे. "आपण आपल्या देशातील पर्यटनाला चालना द्यायला हवी. देश सध्या कोणत्याही श्रेत्रात पुढे जात असेल तरी ते सर्वांसाठीच चांगले आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच आपणही त्यांना पाठिंबा द्यायला हवा," असं शामीने म्हटलं आहे.
व्यापारी संघटनेनं नोंदवला निषेध
मालदीवमधील पर्यटन व्यवसायाशीसंबंधित कंपन्यांची आणि कंपनी मालकांची संघटना असलेल्या द मालदीव असोसिएनश ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने ('माटी'ने) आपल्याच देशातील मंत्र्यांचा निषेध केला आहे. "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीयांचा देशातील काही उपमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून अपमान केला असून आम्ही त्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध करतो," असं 'माटी'ने म्हटलं आहे.
भारत आता गोलंदाजांचा संघ
दरम्यान शामीने मालदीव प्रकरणाबरोबरच आगामी कसोटी मालिकेसंदर्भातही मत मांडलं. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंडदरम्यान 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी हैदराबादमध्ये तर शेवटची कसोटी 11 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाणार आहे. दुखापतीमुळे शमी आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटीमध्ये शमी खेळणार की नाही हे निश्चित नाही. या दौऱ्यासंदर्भात बोलताना शमीने, "मी या दौऱ्यात काहीही नवीन करण्याचा विचार करत नसून मला सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न असतो. ही मालिका घरच्या मैदानावर असल्याने ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तुम्ही चांगली मानसिकता आणि फिटनेस घेऊन मैदानात उतरणं खूप गरजेचं आहे. पूर्वी भारतीय संघ फलंदाजीत वर्चस्व गाजवणारा संघ वाटायचा पण, भारत हा गोलंदाजांचा संघ आहे असं मागील काही काळात अधोरेखित झालं आहे,” असं म्हटलं.