Mohammed Shami Ruled Out IPL 2024: भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी त्याच्यावर सर्जरी करण्याची गरज आहे. बीसीसीआय सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, युकेमध्ये मोहम्मद शमीवर सर्जरी केली जाणार आहे. मोहम्मद शमीची अनुपस्थिती गुजरात टायटन्स संघाला जाणवणार आहे. आधीच आपला कर्णधार हार्दिक पांड्याला गमावलेल्या गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. मागील दोन हंगामात संघाला अभुतपूर्व यश मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. हार्दिक पांड्यानंतर आता शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सचा संघ 2022 मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. दोन वर्षात त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्याच हंगामात त्यांनी आयपीएल स्पर्धा जिंकली होती. तर दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते. पण अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्ज संघाने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. 


या दोन्ही हंगामात मोहम्मद शमीने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता. 33 वर्षीय मोहम्मद शमीने 2022 मध्ये 20 विकेट्स घेतले होते. 2023 मध्ये त्याची कामगिरी उंचावली होती. 18.64 च्या सरासरीने त्याने 28 विकेट्स घेतले होते. 


दरम्यान गुजरात टायटन्सने अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गुजरात टायटन्स मोहम्मद शमीच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करु शकतं. जे खेळाडू अनसोल्ड राहिले होते त्यांच्यातील खेळाडूला गुजरात संधी देऊ शकतं. पण त्याची बेस प्राइस मोहम्मद शमीपेक्षा जास्त असू शकत नाही. 


दुखापतग्रस्त असल्यानेच मोहम्मद शमीला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात मोहम्मद शमी शेवटचा खेळला होता. 


"शमी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनमध्ये घोट्यावरील विशेष इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचला होता. तीन आठवड्यानंतर तो धीम्या गतीने धावण्यास सुरुवात करु शकतो असं सांगण्यात आलं होतं. पण इंजेक्शनचा प्रभाव झाला नाही आणि आता शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरला आहे. तो शस्त्रक्रियेसाठी लवकरच ब्रिटनला रवाना होणार आहे. त्यामुळे आयपीएल खेळण्यावर प्रश्चचिन्ह आहे," असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.


दुसरीकडे मोहम्मद शमी दुखापतीतून न सावरल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) दुखापत पुनर्वसन व्यवस्थापन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.