पुलवामा हल्ला : वीरपत्नींना मोहम्मद शमीची आर्थिक मदत
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी मदतीलाही लगेच सुरुवात झाली. शनिवारी इराणी करंडक स्पर्धेतल्या बक्षिसाची २५ लाखांची रक्कम विदर्भ क्रिकेट संघानं यापूर्वीच शहिदांच्या कुटुंबीयांना देऊ केली आहे. यानंतर आता भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीही शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावला आहे. मोहम्मद शमीनं सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या पत्नींना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
'जेव्हा आम्ही देशासाठी क्रिकेट खेळतो, तेव्हा सीमेवर आमची रक्षा करण्यासाठी जवान उभे असतात. आम्ही आमच्या जवानांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहेत आणि कायमच उभे राहू', असं मोहम्मद शमी म्हणाला.
बीसीसीआयचीही मदत
या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाला किमान ५ कोटी रुपयांची रक्कम द्यायला हवी, असं बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी म्हणलं आहे. या मागणीचं पत्र त्यांनी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पाठवलं आहे. तसंच राज्यांच्या क्रिकेट संघटना आणि आयपीएल टीमनाही मदतीचं आवाहन सी.के.खन्ना यांनी स्वतःच्या अधिकारात केलं आहे. तसंच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २४ फेब्रुवारीला विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या टी-२० सीरिजची पहिली मॅच आणि आयपीएलच्या पहिल्या मॅचवेळी शहीद जवानांना २ मिनिटांची श्रद्धांजली देण्यात यावी, अशी मागणी सी.के.खन्ना यांनी केली आहे.
माजी कसोटीपटू विरेंद्र सेहवागने आपल्या शाळेमध्ये शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल, असं जाहीर केलं आहे. तसंच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंही शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या १०० मुलांना मदत करणार असल्याचे गंभीरने सांगितले आहे. याआधी देखील गौतमने ५० मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यानंतर आता आर्थिक सुबत्ता असलेली बीसीसीआय मदत करणार का आणि किती हे पाहणं औत्सुक्याचं आहे.