मोहम्मद सिराज आणि उमरानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार, Video तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेटर्स मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना कपाळावर गंध लावून देण्यास नकार दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुस्लीम असल्याने दोघांनी टिळा लावण्यास नकार देत हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका काही नेटकरी करत आहेत.
Mohammed Siraj and Umran Malik: भारतीय क्रिकेटर्स मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि उमरान मलिक (Umran Malik) सध्या भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. याचं कारण म्हणजे मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मैदानाबाहेरील या व्हिडीओत मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक कपाळावर गंध (Tilak) लावून घेण्यास नकार देत असल्याचं दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी हिंदू धर्माचा (Hindu Religion) अपमान केल्याची टीका काही नेटकरी करत आहेत. पण गंध लावण्यास नकार देणाऱ्यांमध्ये फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड आणि सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याचाही समावेश होता.
नेमकं काय झालं?
भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) हॉटेलमध्ये दाखल होत असल्याने कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. यावेळी महिला कर्मचारी सर्व खेळाडूंच्या कपाळावर गंध लावून त्यांचं स्वागत करत होती. सर्व खेळाडू टिळा लावून घेत असताना मोहम्मद सिराज आणि उमरान मात्र गंध न लावण्याची विनंती करत निघून गेले. याशिवाय फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड आणि सपोर्ट स्टाफमधील एका सदस्यानेही गंध लावून घेतला नाही.
हिंदू संस्कृतीत गंध लावत पाहुण्यांचं स्वागत करण्याची पद्धत आहे. दरम्यान मोहम्मद सिराज आणि उमरान मुस्लीम असल्यानेच त्यांनी गंध लावून घेतला नाही अशी टीका काही युजर्स करत आहेत.
व्हिडीओ नेमका कधीचा?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडीओ जुना असण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी उमरानला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हा व्हिडीओ श्रीलंका किंवा न्यूझीलंडविरोधातील मालिकांदरम्यानचा असण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याने सिराज आणि मोहम्मद शामी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. मोहम्मद सिराजने 15 कसोटी सामने खेळले असून 46 विकेट्सघ घेतल्या आहेत.