मुंबई: टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni)ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. पण 15 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात असतानाच महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केलं. धोनीच्या या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण झाली. धोनीनं भारताला 2007 मध्ये वर्ल्ड टी-20 चे विजेतेपद, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. दरम्यान टीम इंडियाने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर कब्जा केला होता. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनल सामन्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हा' सल्ला धोनीने हरभजनला दिला


हरभजन सिंगने खुलासा केला आहे की, 2011 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचे 33 वे षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक दरम्यान कर्णधार धोनीने त्यांच्यासोबच चर्चा केली. त्यावेळी भारतीय कर्णधाराने हरभजनला उमर अकमलच्या विकेटभोवती गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर भज्जीने धोनीच्या सूचनेचे पालन केले आणि उमर अकमलला बाद केले. 


महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.


आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकचं कर्णधार


आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला आहे.