IPL 2024 : धोनीच्या आयपीएल निवृत्तीची वेळ जवळ आलीये का? इतिहासात पहिल्यांदा असं घडलं
MS Dhoni IPL retirement : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, पण चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा असे काही घडले, जे क्रिकेट इतिहासात याआधी घडताना कोणीही पाहिले नसेल.
PBKS vs CSK, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला 168 धावांचे आव्हान दिलं होतं. पण सीएसकेच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या प्रदर्शनामुळे (CSK vs PBKS) पंजाबची फलंदाजी ढासळली आणि चेन्नईचा संघ हा सामना 28 धावांच्या फरकाने जिंकण्यात यशस्वी झालाये. प्रथम फलंदाजी करत असताना सीएसकेची सुरूवात चांगली झाली नव्हती, पण यानंतर ऋतुराज गायकवाडचे 32 रन, मिचेलचे 30 रन आणि रविंद्र जडेजा याचे दमदार 43 धावांच्या योगदानामुळे चेन्नई पंजाबच्या संघाला 168 धावांचे आव्हान देऊ शकली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर कहर माजवला, रविंद्र जडेजा याने गोलंदाजीत पण चांगले प्रदर्शन करत पंजाबच्या 3 फलंदाजांना तंबूत परत पाठवले होते. खरं तर जडेजाच्या या ऑलराउंड प्रदर्शनामुळे पंजाबची फलंदाजी 139 धावांवरच ऑल आऊट झाली आणि सीएसकेने हा सामना 28 धावांनी आपल्या खिशात टाकला, पण या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्यासोबत टी20 क्रिकेटच्या करिअरमध्ये अशी आश्चर्याची गोष्ट घडलीये, जी एकदाही या आधी त्याच्यासोबत घडलेली नाही.
धोनीच्या करिअरमध्ये पहिल्यांदा असं घडलं
चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना, महेंद्रसिंग धोनी हा हर्षल पटेलच्या 19 व्या ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी आला, यानंतर ओव्हरच्या पाचव्या आणि आपल्या पहिल्याच बॉलवर धोनी हा क्लिन बोल्ड (MS Dhoni Golden Duck) झाला होता. यामुळे, आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनी हा पहिल्यांदाच क्लिन बोल्ड झाला आहे. तर अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, आजच्या सामन्यात धोनी हा 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. विशेष गोष्ट म्हणजे टी-20 च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की, महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजी करताना 9 व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेला आहे. तर धोनीच्या या आगळ्या-वेगळ्या डावपेचामुळे क्रिकेट फॅन्समध्ये चर्चेला सुरूवात झालीये की, धोनी आता लवकरच आयपीएलमधून निवृत्ती घेणार आहे.
महेंद्रसिंग धोनी घेणार आयपीएलमधून निवृत्ती?
आयपीएल 2024 च्या पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी हा चक्क 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला होता. यामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये अशी चर्चासु्द्धा रंगली आहे की, आपल्या निवृतीआधी, महेंद्रसिंग धोनी हा, चेन्नईसाठी चांगल्या फिनिशर्सचे पर्याय शोधत आहे. कारण आज धोनी आधी मोइन अली, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि मिचेल सॅटनर यांना फंलदाजी करण्याची संधी मिळाली होती. याउलट, अनेकदा असं पण बघायला मिळालं आहे की, चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज समीर रिझवी हा सुद्धा काही सामन्यात धोनी आधी फलंदाजी करण्यासाठी आला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या आधी झालेल्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात धोनीने स्वतःला स्ट्राइकवर ठेवण्यासाठी, डॅरेल मिचेल याचा रन नाकारला होता. यावरून असे दिसतयं की, धोनी हा त्याच्या फॅन्सना आपल्या फलंदाजीची एक शेवटची झलक दाखवण्यासाठी हे सगळं करत आहे. काही वेळेस तर शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा संघाला जिंकण्यासाठी फक्त थोड्या धावांची गरज असते तेव्हा, धोनी हा फलंदाजी क्रमामध्ये वर बॅटिंग करायला सुद्धा आला आहे. या साऱ्या गोष्टींवरून फक्त एकच गोष्ट निदर्शनास येत आहे की, धोनी हा स्वतःच्या आणि आपल्या फॅन्सच्या मनोरंजनासाठी हे शेवटचे वर्ष खेळतोय. यामुळे आता धोनी लवकरचं निवृत्त होणार अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 सुरू होण्याआधी महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडला सोपवले होते. यामुळे बऱ्याच क्रिकेट तज्ञ आणि क्रिकेट फॅन्स यांनी तेव्हा गृहीत धरलं होतं की महेंद्रसिंग धोनी याचे हे शेवटचे वर्ष असू शकतं. त्यामुळे आता धोनी लवकरच आयपीएलला टाटा गुड बाय करण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळतंय.