रवी शास्त्रींचा पत्ता कट होणार? MS Dhoni ला मिळू शकते मोठी जबाबदारी
T-20 विश्वचषकासाठी धोनीला मेंटोर बनवण्यात आलं आहे, दुसरीकडे रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपत आला आहे
मुंबई : आयसीसी T-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) मोठी जबाबदारी सोपवली आहे. धोनीची टीम इंडियाच्या (Team India) मेंटोरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण या नियुक्तीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बीसीसीआयने माजी भारतीय कर्णधाराची निवड का केली? भविष्यात धोनीवर मोठी जबाबदारी येणार? पण याबरोबरच आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे 'रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचं मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) म्हणून भविष्य आता किती सुरक्षित आहे?
धोनीला मेंटोर बनवणं हे मोठ्या जबाबदारीचं लक्षण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी धोनीला मेंटोर म्हणून भारतीय संघात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. फार कमी लोकांना, अगदी बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही या हालचालीची माहिती नव्हती. विशेष म्हणजे बुधवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान मोठा निर्णय जाहीर झाला त्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित नव्हते. त्याची अनुपस्थिती अनेक नागरिकांनाही जाणवली. बीसीसीआयने मात्र सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये असल्याचं कारण दिलं.
धोणी त्याच्या झटपट निर्णय घेण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. शिवाय धोणीच्या नेतृत्तात भारतीय टीमने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे त्याच्या निर्णयांचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होईलं असं बीसीसीआयला वाटतं आहे.
रवी शास्त्रींना मिळणार डच्चू?
रवी शास्त्री यांचा करार वाढवला नाही तर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते अशीही चर्चा आहे. सध्या हा प्रयोग किती यशस्वी होईल हे पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा सुरू होईल तेव्हा दिसेल.
धोणीवर मोठी जबाबदारी?
आधी टीम इंडिया आणि सध्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या खेळाडूंना धोनीचं मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड धोनीकडे शास्त्रीची दीर्घकालीन बदली म्हणून पाहत आहे. जर भारताने टी -20 विश्वचषक जिंकला आणि शास्त्रीने निवृत्तीचा निर्णय घेतला, तर धोनी निश्चितच प्रबळ दावेदार असेल.
रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक आहेत. त्यांना तिसरा कार्यकाळ दिला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे भविष्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून एक नवीन चेहरा दिसू शकतो. पण यात एक अडचण आहे. धोनी सध्या आयपीएलमध्ये सीएसकेचा कर्णधार आहे आणि आयपीएलमध्ये खेळत राहू इच्छितो.