...म्हणून घरच्या मैदानातल्या पॅव्हेलियनच्या उद्घाटनाला धोनीचा नकार
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.
रांची : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. धोनीच्या घरच्या मैदानामध्ये हा सामना होणार आहे. घरच्या मैदानात धोनीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरू शकते. कारण वर्ल्ड कपनंतर धोनी संन्यास घेऊ शकतो. झारखंड क्रिकेट असोसिएशननं रांचीच्या स्टेडियममधल्या एका पॅव्हेलियनला धोनीचं नाव द्यायचा निर्णय घेतला आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशननं धोनीनंच या पॅव्हेलियनचं उद्घाटन करावं, अशी मागणी केली होती पण धोनीनं ही मागणी फेटाळून लावली आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव देबाशिष चक्रवर्ती म्हणाले, 'मागच्यावर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये नॉर्थ ब्लॉकचं नामकरण धोनीच्या नावावर करण्याचा निर्णय झाला. याचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही धोनीला आग्रह केला. पण धोनीनं याला नकार दिला. स्वत:च्याच घरात काय उद्घाटन करायचं? धोनीनं विनम्रतापूर्वक सांगितलं.'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर स्टॅण्ड आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर विरेंद्र सेहवाग गेट आहे. अशाच प्रकारे रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनी पॅव्हेलियन बनवण्यात आलं आहे. भारतामध्ये खेळाडूंच्या नावानं पॅव्हेलियन बनवण्याची परंपरा कमी आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पॅव्हेलियनला खेळाडूंची नावं दिली जातात.
सुरक्षा भेदून भेटायला आलेल्या फॅनसोबत धोनीची 'पकडापकडी'
धोनीची घरच्या मैदानात ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरू शकत असली तरी यासाठी काही खास तयारी केली नसल्याचं झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. ५ वनडे मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारत २-०नं आघाडीवर आहे. शुक्रवारी तिसरी वनडे जिंकली तर भारत सीरिजही खिशात टाकेल. ३४० वनडेपैकी धोनी रांचीच्या मैदानात ३ वनडे खेळला आहे. यात धोनीला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. ३ मॅचमध्ये धोनीली २१ रनच करता आल्या आहेत.
रांचीमध्ये धोनीची कामगिरी
रन | विरुद्ध टीम | निकाल | वर्ष |
१० नाबाद | इंग्लंड | भारताचा विजय | २०१३ |
--- | ऑस्ट्रेलिया | सामना रद्द | २०१३ |
११ रन | न्यूझीलंड | भारताचा पराभव | २०१६ |