MS Dhoni Stunning Gesture: भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेल्या महेंद्र सिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष उलटली आहे. मात्र त्यानंतरही धोनीची जादू कायम असून केवळ धोनीला मैदानात पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते येतात याचा प्रत्यय दरवर्षी इंडियन प्रमिअर लिगमध्ये पहायला मिळतो. यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये पाचव्यांदा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला जेतेपद पटकावून देत धोनीने कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबर केली आहे. धोनीची लोकप्रियता एवढी आहे की तो या आयपीएलमध्ये देशातील कोणत्याही मैदानात खेळला तरी केवळ त्याच्यासाठी सीएसकेच्या संघाला पाठिंबा देणारे हजारो प्रेक्षक मैदानात गर्दी करायचे. भारतामधील प्रत्येक मैदान जणू धोनीसाठी होम ग्राऊण्डच झालं होतं इतकी प्रचंड त्याची क्रेझ आहे. प्रत्येक मैदानात तो फलंदाजीला उतरल्यानंतर 'धोनी... धोनी...'चा जयघोष ऐकू यायचा. धोनीच्या लोकप्रियतेच्या आसपासही कोणी नाही याची प्रचिती सोशल मीडियाबरोबरच मैदानावरही येत होती. मात्र धोनीचा हा चाहता वर्ग केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर जे स्वत: सेलिब्रिटी आहेत त्यांच्यातही आहे.


व्हीआयपी लोकही चाहते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीबरोबर फोटो काढण्यासाठी त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी अति महत्त्वाच्या लोकांनाही धावपळ केल्याचं यंदाच्या आयपीएलमध्ये पहायला मिळालं. यामध्ये अगदी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश होता. धोनीची लोकप्रियता आजी, माजी क्रिकेटपटूंमध्येही आहे. खास करुन तरुण क्रिकेटपटूंमध्ये धोनीची प्रचंड क्रेझ आहे. मंगळवारी धोनीने अशाचप्रकारे आपल्या एका स्पेशल चाहत्याला खास भेट दिली.


धोनीने कोणाला आणि काय खास भेट पाठवली?


अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघामधील विकेटकीपर रेहमनुल्ला गुरबाझला (Rahmanullah Gurbaz) धोनीने खास भेट दिली. धोनीने रेहमनुल्लाला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी भेट केली आहे. रेहमनुल्लानेच सोशल मीडियावर या जर्सीबरोबरच फोटो पोस्ट करत यासंदर्भातील माहिती पोस्ट केली आहे. सीएसकेची जर्सी पकडून रेहमनुल्लाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याने, "थेट भारतामधून ही खास भेटवस्तू पाठवल्याबद्दल एम. एस. धोनी सरांचे विशेष आभार," अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमध्ये रेहमनुल्लाने हार्टचं इमोजीही वापरलं आहे. 



दोनच आदर्श


मागील वर्षाच्या पर्वामध्ये रेहमनुल्ला हा गुजरात टायटन्सच्या संघात होता. यंदाच्या पर्वात रेहमनुल्ला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळला. त्याने त्याच्या 11 सामन्यांमध्ये 227 धावा केल्या. त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यामध्ये एक भन्नाट झेल घेतल्यानंतर त्याची तुलना धोनीशी करण्यात आली होती. "माझ्या आयुष्यामध्ये मला 2 खेळाडूंबरोबर खेळायचं होतं. मात्र दुर्देवाने मला ते जमलं नाही. यापैकी पहिला खेळाडू म्हणजे ए.बी. डिव्हिलियर्स. तो माझा आदर्श आहे. मी लहानपणापासून त्याला फॉलो करतोय. तो निवृत्त झाला आहे. मात्र यंदाच्या वर्षी मला एमएस धोनीबरोबर किंवा त्याच्याविरुद्ध पण एकाच सामन्यात खेळता येईल. हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो," असं रेहमनुल्लाने आयपीएल सुरु होण्याआधी म्हटलं होतं.