चेन्नई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत बीसीसीआयने नवीन करार केला नाही. यानंतर धोनीचं भवितव्य काय? धोनी भारताकडून पुन्हा खेळणार का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यातच आता आयपीएलच्या चेन्नई टीमने धोनीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. यावर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळणार आहे, तसंच २०२१ सालच्या मोसमासाठीही आम्ही त्याला टीममध्ये कायम ठेवणार आहोत, असं चेन्नईच्या टीमचे मालक एन.श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२१ सालच्या आयपीएलआधी सगळ्या टीमना त्यांच्या खेळाडूंना सोडून द्यावं लागणार आहे. खेळाडूंना सोडून दिल्यानंतर पुन्हा एकदा या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. पण नेहमीप्रमाणेच टीमना काही खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे.



धोनीसोबत करार का झाला नाही? असा प्रश्न बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीलाही विचारण्यात आला. पण मी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं सौरव गांगुलीने सांगितलं. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.


बीसीसीआयच्या कराराबाबत धोनीला माहिती देण्यात आली होती, असं बीसीसीआयच्या अधिकार्याने एएनआयशी बोलताना सांगितलं. एखाद्या खेळाडूसोबत करार करण्यासाठी त्याने कमीतकमी ३ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळणं बंधनकारक आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


२०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेट खेळला नाही. बीसीसीआयने केलेला हा करार ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा आहे, त्यामुळे धोनीशी करार करण्यात आला नसल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसंच धोनीशी करार झाला नाही, म्हणजे तो भारताकडून खेळू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.


एमएस धोनी हा २०२० सालचा टी-२० वर्ल्ड कप खेळू शकतो, असे संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. धोनी टी-२० वर्ल्ड कप खेळणार का नाही ते आयपीएलमधल्या धोनीच्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असं रवी शास्त्री म्हणाले होते.