आता माहीचाही १८०० रुपयांचा गोंधळ! थकबाकीदारांच्या यादीत नाव
१,८०० रुपयांच्या त्या व्हिडिओने कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
रांची : १,८०० रुपयांच्या त्या व्हिडिओने कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. घरकाम करणारी महिलेला १,८०० रुपयांचा हिशोब समजावताना होणाऱ्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यातच आता भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही १,८०० रुपयांनीच गोंधळ केला आहे. झारखंडचा सर्वाधिक करदाता असणाऱ्या धोनीने १,८०० रुपयांची थकबाकी केली आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या थकबाकीदारांच्या यादीत धोनीचं नाव आलं आहे. ज्या स्टेडियममध्ये धोनीच्या नावाने पॅव्हेलियन आहे, त्याच क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनीची थकबाकी आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनी आजीवन सदस्य आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वेबीनारच्या माध्यमातून झाली. या सभेत २०१९-२० या वार्षिक रिपोर्ट देण्यात आला. या रिपोर्टमध्ये धोनीचं नाव ५९व्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नावावर ३१ मार्च २०२० पर्यंतची थकबाकीची रक्कम दाखवण्यात आली आहे.
काहीतरी त्रुटी आल्यामुळे धोनीचं नाव या यादीमध्ये आलं असेल, अशी प्रतिक्रिया धोनीचे पहिले प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिली. धोनीचं नाव खराब करण्यासाठी तर अशा गोष्टी केल्या जात नाहीयेत ना? असा सवालही बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी असोसिएशनचे सचिव संजय सहाय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २७ डिसेंबर २०१९ ला असोसिएशनच्या कमिटी ऑफ मॅनेजमेंटने धोनीला आजीवन सदस्य बनवलं होतं. त्यावेळच्या नियमानुसार धोनीने सदस्यत्वासाठीचं शुल्क म्हणून १० हजार रुपयांचा चेक जमा केला होता. पण संवादाच्या अभावामुळे जीएसटीची रक्कम जमा करण्यात आली नव्हती. ही थकबाकी धोनीच्या नावाने जो चेक देण्यात आला आहे, त्यातूनच भरली जाऊ शकते, त्यामुळे यावरुन वाद निर्माण करणं योग्य नाही, असं असोसिएशनचे सचिव संजय सहाय म्हणाले आहेत.