असं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण
महेंद्रसिंह धोनी... भारताचा मॅच फिनीशर, संकटमोचक, विश्वचषक विजेता कर्णधार.
मुंबई : महेंद्रसिंह धोनी... भारताचा मॅच फिनीशर, संकटमोचक, विश्वचषक विजेता कर्णधार. त्याची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी. लष्कराने प्रतिष्ठेच्या पॅराशूट रेजिमेंटच्या प्रादेशिक सेनेतून माहीला मानद लेफ्टनंट कर्नल ही रँक दिलीय. त्यानुसार माहीने २ महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे.
विश्वचषकाच्या अपयशी दौऱ्यानंतर माहीने बटालियनसह प्रशिक्षणाची मागणी केली होती. त्याची ही मागणी भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मान्य केली आहे. मात्र या दोन महिन्यांच्या काळात धोनी कोणत्याही मोहिमेचा भाग नसेल. पण त्याचं काही प्रशिक्षण जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे.
माही ज्या बटालियनचा भाग आहे त्या बटालियनचं मुख्यालय बंगळुरूत आहे. मात्र सध्या त्याची बटालियन जम्मू काश्मीरमध्ये तैनात आहे. माहीचं प्रशिक्षण खडतर असणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान माही सर्वसामान्य सैनिकासारखाच राहणार आहे. पॅराशूट रेजिमेंटचा खऱ्या अर्थाने सदस्य होण्यासाठी धोनीला विमानातून कमीत कमी पाच पॅराशूट उड्या यशस्वीरित्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. आग्रा इथे हे ट्रेनिंग पूर्ण होणार आहे.
विश्वचषकातून भारताचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीच्या ऐवजी ऋषभ पंत खेळणार आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याचं बळ भारतीय लष्कराच्या बाहूंमध्ये आहे. धोनी त्याच्या या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणातून नवी उर्जा घेऊनच समोर येईल, अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.