मुंबई : टीम इंडियाची निवड करणाऱ्या एमएसके प्रसाद यांच्या समितीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने धक्का दिला आहे. निवड समितीचा कार्यकाळ समाप्त झाला आहे, त्यामुळे ही निवड समिती आता टीम इंडियाची निवड करणार नाही, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयची ८८वी वार्षिक सभा पार पडली, यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. यामध्ये बीसीसीआयच्या संविधानामध्ये संशोधन करण्यात आलं, त्यामुळे गांगुली आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएसके प्रसाद आणि गगन खोडा २०१५ साली निवड समितीवर नियुक्त झाले. जतीन परांजपे, सनरदीप सिंग आणि देवांग गांधी २०१६ मध्ये निवड समितीत आले. या समितीतला एकही सदस्य आता आपलं काम पुढे चालू ठेवू शकणार नाही, असं गांगुलीने सांगितलं. आता निवड समितीचा कार्यकाळ निर्धारित केला जाईल. प्रत्येक वर्षी निवड समिती सदस्य नियुक्त करण्याची गरज नाही, असं गांगुली म्हणाला.


निवड समितीने चांगलं काम केलं असल्याची प्रतिक्रिया गांगुलीने दिली. युवराज सिंग, हरभजन सिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सध्याच्या निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एमएसके प्रसाद यांच्याऐवजी एखाद्या मजबूत क्रिकेटपटूची नियुक्ती व्हावी. गांगुलीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी हरभजनने केली होती.