मुंबई : भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या धोनीनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दोनच दिवसांपूर्वी धोनी झारखंडकडून विजय हजारे ट्रॉफीची क्वार्टरफायनल खेळेल अशी घोषणा केली होती. पण धोनीनं एमएसके प्रसाद यांना तोंडावर पाडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएसके प्रसाद यांनी अशाप्रकारे सार्वजनिकरित्या घोषणा करण्याआधी धोनीशी चर्चा केली होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एमएसके प्रसाद धोनीशी कसा संपर्क करतात ते मला पाहायचं आहे, असं बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला आहे.


धोनीच्या या निर्णयामुळे निवड समिती आणि खेळाडूंमध्ये संवादाचा अभाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. खेळाडू स्वत:चा कार्यक्रम स्वत:च ठरवतात. धोनी मागच्या २ वर्षांपासून बॅटिंग फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे तो महाराष्ट्राविरुद्ध झारखंडकडून विजय हजारे ट्रॉफीची क्वार्टरफायनल खेळेल, असं बोललं जात होतं. पण झारखंडचे प्रशिक्षक राजीव कुमार यांनी धोनीनं न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


मी नसताना टीमनं चांगलं प्रदर्शन केलं आहे. यावेळी टीममध्ये येऊन टीमचं संतुलन बिघडवणं योग्य नाही, असं धोनीला वाटतंय. म्हणून त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्याचं ठरवलं आहे, असं राजीव कुमार यांनी सांगितलं. धोनीनं यावर्षी २२ दिवस (१५ वनडे आणि ७ टी-२० मॅच) क्रिकेट खेळलं आहे. एवढ्या दिवसांच्या विश्रांतीनंतर क्रिकेट खेळल्यामुळे धोनीला फॉर्मसाठी झगडावं लागतंय.