मुंबई मॅरेथॉनला गालबोट, वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
१७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लागलं आहे.
मुंबई : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लागलं आहे. ६४ वर्षांच्या गजानन मालजलकर या मॅरेथॉन धावपटूचं निधन झालं. मॅरेथॉनमध्ये धावत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते.
मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किमी महिला गटात सुधा सिंने बाजी मारली. सुधा सिंगने २ तास ४५ मिनिट ३० सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. तर महाराष्ट्राची ज्योती गवते २ तास ४९ मिनिटं १४ सेकंदांसह दुसरी आणि श्यामली सिंग २ तास ५८ मिनिटं ४४ सेकंदांसह तिसरी आली.
आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळवणारी ही मुंबई मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पहाटे सव्वापाच वाजता सुरु झाली. अर्धमॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात तीर्था पुन याने १:०५:३९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. मान सिंग हा १:०६:०६ सेकंद वेळेसह रौप्यपदकावर नाव कोरले तर, बलीअप्पा ए बी ने १:०७:११ वेळेसह कांस्यपदक पटकावले.
तर, अर्धमॅरेथॉनच्या महिला गटात महाराष्ट्रच्या धावपटूंनी चमक दाखवली. आरती पाटीलने १:१८.०३ सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळवले. तर, नाशिकच्या मोनिका आथरेने १:१८:३३ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले. या गटात पारुल चौधरीने १:१५:३७ वेळेसह अव्वल स्थान पटकावले.