मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईची टीम झगडताना दिसत आहे. प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी मुंबईला पंजाब आणि दिल्लीविरुद्धची मॅच जिंकणं आवश्यक आहे. प्ले ऑफला जाण्यासाठी या दोन मॅच जिंकण्याबरोबरच इतर टीमच्या कामगिरीवरही मुंबईचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचआधी मुंबईचा खेळाडू आदित्य तरेनं पत्रकार परिषद घेतली. या मोसमामध्ये त्याच्याऐवजी ईशान किशनला का संधी देण्यात आली याबाबतही त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडचा असलेल्या ईशान किशनकडे प्रतिभा असल्यामुळे त्याला टीममध्ये संधी देण्यात आल्याचं आदित्य तरे म्हणाला. ईशान किशन हा १९-२० वर्षांचा आहे. प्रतिभा बघूनच त्याला पहिली पसंती देण्यात आल्याचं वक्तव्य तरेनं केलं आहे.


ईशान किशनच्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात होत आहे. या कालावधीमध्ये त्याला मुंबईकडून खेळण्याची उत्कृष्ट संधी मिळाल्याचं वक्तव्य तरेनं केलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये ईशाननं २१ बॉलमध्ये ६२ रनची वादळी खेळी केली होती. या खेळीमुळे मुंबईचा कोलकात्याविरुद्ध शानदार विजय झाल्याचं आदित्य तरे म्हणाला. मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या विकेट कीपर आदित्य तरेला यावर्षी मुंबईनं एकही संधी दिली नाही. त्याच्याऐवजी झारखंडच्या ईशान किशनला खेळवण्यात आलं.