मुंबई : यंदाच्या मोसमातला पहिला सामना अखेर मुंबईनं जिंकला आहे. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४६ रन्सनं विजय झाला आहे. मुंबईनं ठेवलेल्या २१४ रन्सचा पाठलाग करताना बंगळुरूला २० ओव्हरमध्ये १६७/८ एवढाच स्कोअर करता आला. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद ९२ रन्स केल्या पण बंगळुरूच्या इतर कोणत्याही बॅट्समननी त्याला साथ दिली नाही. मुंबईकडून कृणाल पांड्यानं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर बुमराह आणि मॅकलेनघनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मयंक मार्कंडेला एक विकेट घेण्यात यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये बंगळुरूनं टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला बोलावलं. २० ओव्हरमध्ये मुंबईनं ६ विकेट गमावून २१३ रन्स केल्या. मॅचच्या पहिल्या दोन बॉललाच मुंबईला दोन धक्के बसले. उमेश यादवनं पहिल्या बॉलला सूर्यकुमार यादवला आणि दुसऱ्या बॉलला ईशान किशनला बोल्ड केलं. यानंतर रोहित शर्मा आणि एविन लुईसनं तुफान फटकेबाजी केली.


रोहित शर्मानं ५२ बॉलमध्ये ९४ रन केल्या. यामध्ये १० फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. एविन लुईसनं ४२ बॉलमध्ये ६५ रन केल्या. लुईसच्या खेळीमध्ये ६ फोर आणि ५ सिक्स होत्या. तळाला आलेल्या हार्दिक पांड्यानं ५ बॉलमध्ये नाबाद १७ रन केल्या. यामध्ये २ सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. बंगळुरूकडून उमेश यादव आणि कोरे अंडरसननं सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्सला एक विकेट मिळाली.