मुंबई : स्वप्न पाहावी आणि नुसती पाहावी नाहीत तर ती साकार करण्याची जिद्दही असावी. ही जिद्द बाळगली 11 वर्षांच्या मुलानं आणि त्याच जिद्दीच्या जोरावर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पोहोचण्याचा मान मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील नायगांव भागात राहणा-या अवनीश भाईगडे असं या अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे. सध्या त्याची खूप चर्चा होत आहे. याचं कारणही तेवढंच खास आहे. 11 वर्षाच्या अवनीश विजय भाईगडेची नेपाळमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय फुटबॉल गेम्समध्ये भारतीय फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे मुंबई विभागातून निवड झालेल्यांमध्ये अवनीश एकमेव मुलगा आहे. नेपाळमध्ये अंडर 13th ग्रूपची ही सहावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात खेळवली जाणार आहे. त्यात अवनीश भारताच्या फुटबॉल टीमचा एक भाग असणार आहे. 


अवनीशची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. ऑलिम्पिक कमिटीकडून मान्यता मिळालेल्या या स्पर्धेला युनेस्को, ICSSPE, TAFISA, WHO, FIT INDIA यांचं सहाकार्य लाभलं आहे. अवनीश हा मुंबईतल्या डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेत आहे. 


ज्युनिअर केजीपासून तो फुटबॉल खेळत आहे. कोरोना काळातही अवनीशचं हे खेळणं थांबलं नव्हतं. अवनीशने महाराष्ट्रतर्फे मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवत वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलं आहे. या पदकानंतर अवनीशने मागे वळून पाहिलं नाही. 



आता ज्या स्पर्धेत अवनीश उतरतो त्या स्पर्धेत तो पदक मिळवूनच येतोय...त्यामुळे फक्त फुटबॉलच नाही तर कुस्तीमध्येही सुवर्ण पदक, कराटेमध्ये रौप्य पदक अवनीशने पटकावलं आहे. तसंच गोव्यात झालेल्या पहिल्या ऑलिम्पिक नॅशनल चॅम्पियनशीपच्या 12 वर्षाखालील स्केटींग स्पर्धेतही अवनीशने अव्वल ठरत रौप्य पदक पटकावलं. फूटबॉल, कराटे, स्केटींगसह अवनीशला स्वीमिंग, रेसलिंग, डिस्कस थ्रो या खेळांचीही आवड आहे.