कोलकाता : बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होण्यासाठी सौरव गांगुली पूर्णपणे तयार आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. त्याआधी गांगुलीने माध्यमांशी संवाद साधला. आपल्या कार्यकाळात प्रथम श्रेणी क्रिकेटवर सगळ्यात जास्त लक्ष देणार असल्याचं गांगुलीने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रथम श्रेणी क्रिकेटच भारताच्या क्रिकेटचा आधार आहे. माझी प्राथमिकता प्रथम श्रेणी क्रिकेट आङे. आम्ही त्यांचं आयुष्य बदलून टाकू, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट भारतीय क्रिकेटचा पाया आहे. आपण फक्त वरती लक्ष देतो, पण आम्ही पायावर लक्ष ठेवून तो बदलणार आहे,' असं आश्वासन गांगुलीने दिलं.


सौरव गांगुलीने कर्णधार विराट कोहलीचंही कौतुक केलं. विराट हा चॅम्पियन खेळाडू असल्याचं गांगुली म्हणाला. तसंच भारतीय टीम चांगली आहे. गेल्या काही दिवसात ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. पण त्यांनी मोठी स्पर्धा जिंकलेली नाही, असं वक्तव्य गांगुलीने केलं.


अध्यक्ष व्हायचा मार्ग मोकळा झाल्यानंतर गांगुलीने त्याच्या नव्या टीमसोबतचा एक फोटो शेयर केला होता. या फोटोमध्ये जय शाह, जयेश जॉर्ज, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, अरुण धुमल आणि माहिम वर्मा आहेत.


बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह, उपाध्यक्ष माहिम वर्मा, संयुक्त सचिव जयेश जॉर्ज, कोषाध्यक्ष अरुण धुमल आणि आयपीएलच्या अध्यक्षपदी ब्रजेश पटेल यांची नियुक्ती होणार आहे.