`माझं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं`; आयपीएलच्या `व्हायरल` मुलीचा संताप
आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरूचा सामना बघायला आलेली एक मुलगी चांगलीच व्हायरल झाली.
मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरूचा सामना बघायला आलेली एक मुलगी चांगलीच व्हायरल झाली. या मुलीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. बंगळुरूच्या टीमची यंदाच्या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली असली, तरी बंगळुरूच्या या फॅनची जोरदार चर्चा झाली. आयपीएलमुळे व्हायरल झाल्यानंतर ही मुलगी पहिल्यांदाच समोर आली आहे. दीपिका घोष असं या मुलीचं नाव आहे.
बंगळुरू आणि हैदराबादमध्ये झालेल्या मॅचदरम्यान दीपिका स्टेडियममध्ये आली होती. कॅमेरामध्ये दिसल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दीपिकाला सोशल मीडियावर फॉलो रिक्वेस्ट यायला सुरुवात झाली. एवढच नाही तर इन्स्टाग्रामवर दीपिकाला अधिकृत अकाऊंटची ब्लू टीकही मिळाली.
सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर माझं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तसंच माझ्याबद्दल ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या पाहून मी दु:खी असल्याचं दीपिका घोष म्हणाली आहे.
दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट
'माझं नाव दीपिका घोष आहे आणि माझ्याबद्दल सांगितली गेलेली ही फक्त एकच गोष्ट १०० टक्के खरी आहे. मला कोणत्याही प्रसिद्धीची गरज नव्हती. सेलिब्रिटी नाही, तर सामान्य मुलगी म्हणून मी मॅच एन्जॉय करण्यासाठी आले होते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी काहीही केलेलं नव्हतं.'
'माझी ओळख, वैयक्तिक आयुष्य काही क्षणात उद्ध्वस्त झालं. एका दिवसात माझ्या पुरुष फॉलोअर्सनी या व्यासपीठावरून अपरिपक्व, अश्लिल, वाईट आणि लज्जास्पद प्रतिक्रिया दिल्या. एवढच नाही तर महिलांकडून झालेला द्वेष माझ्यासाठी जास्त धक्कादायक होता. माझ्याबद्दल माहिती नसतानाही तुम्ही एवढ्या जलद आणि क्रुर गोष्टी कशा म्हणालात? मी तुमच्यातलीच एक आहे.'
'हो मी बंगळुरूच्या टीमला पाठिंबा देणारी #theRCBgirl आहे, पण त्याशिवायही माझी वेगळी ओळख आहे.'