जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ
Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Vijaya Hazare Trophy: आयपीएल स्पर्धेच्या 16 पर्वासाठी संघ व्यवस्थापनांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही खेळाडूंनी रिलीज केलं असून काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांना रिलीज केल्याने संघ व्यवस्थापनावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाची अशीच स्थिती झाली आहे. कारण रिलीज केलेल्या नारायण जगदीसन (Narayan Jagdeesan) याने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2022) ऐतिहासिक कामगिरी करत द्विशतक ठोकलं आहे.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. तर लिस्ट-ए क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या अली ब्राऊनच्या (Ali Brown) नावावर आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना नारायण जगदीसन याने मागे टाकलं आहे.
एन जगदीसनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 141 चेंडूत 277 धावा केल्या. या इनिंगमध्ये एन जगदीसननं 25 चौकार आणि 15 षटकार ठोकले. लिस्ट-ए क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा अली ब्राउनच्या नावावर होत्या. त्याने 2002 मध्ये 268 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्मा 264 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगदीसननं सलग पाच वनडे सामन्यात शतकं झळकावलं आहे. हरयाणा विरुद्ध 128, आंध्र प्रदेश विरुद्ध नाबाद 114, छत्तीसगड विरुद्ध 107 आणि गोवा संघाविरुद्ध 168 धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने एन जगदीशनला रिलीज केलं आहे. आयपीएल लिलावात चेन्नईनं त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. महेंद्रसिंह धोनीमध्ये सर्वोत्तम खेळाडूंना न्याय देण्याची क्षमता आहे, परंतु जगदीशनच्या बाबतीत चूक झाली असं म्हणावं लागेल.चेन्नई सुपर किंग्सनं ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिलन, हरी निशांथ, ख्रिस गार्डन, भगत वर्मा, केएम आसीफ आणि नारायण जगदीसन यांना रिलीज केलं आहे. तर महेंद्रसिंह धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी आणि महीष थिक्साना हे खेळाडू चेन्नईच्या संघात आहेत.