बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला असला तरी ही मॅच अत्यंत रोमहर्षक झाली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही भारताच्या इतर बॅट्समननी निराशा केल्यामुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये एकटा विराट कोहली संघर्ष करताना दिसला. पण इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं विराट कोहलीच्या निर्णयांवर टीका केली आहे. कोहलीच्या या निर्णयांमुळे भारताचा पराभव झाल्याचं मत नासिर हुसेननं मांडलं आहे.


या मॅचमध्ये विराट जबरदस्त खेळला. तो भारताला एकहाती विजयाजवळ घेऊन आला. पण या पराभवाची जबाबदारी विराटला स्वीकारावी लागेल. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अवस्था ८७/७ अशी होती. सॅम कुरेन आणि आदिल रशीद मैदानात होते. पण तेव्हा रवीचंद्रन अश्विन अचानक एक तासासाठी बॉलिंगला आला नाही. यानंतर भारताची मॅचवरची पकड ढिली झाली. अश्विनची डावखुऱ्या बॅट्समनला बॉलिंग करतानाची सरासरी १९ आहे आणि समोर सॅम कुरेन हा २० वर्षांचा डावखुरा बॅट्समन असताना अश्विनला बॉलिंग का देण्यात आली नाही, असं सवाल नासिर हुसेननं विचारला आहे. अश्विननं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ४ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ अशा एकूण ७ विकेट घेतल्या.