अबु धाबी : अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यामध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानला पराभूत केलं आहे. न्यूझीलंडकडून पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या एजाज पटेलच्या बॉलिंगमुळे न्यूझीलंडचा पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ४ रननी विजय झाला. टेस्ट क्रिकेटमधला न्यूझीलंडचा हा सगळ्यात कमी अंतराचा विजय आहे. तसंच पाकिस्तानचाही हा सर्वात कमी अंतराचा पराभवदेखील आहे. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. ३० वर्षांच्या एजाज पटेलनं चौथ्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे एजाजला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं पहिले टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला १५९ रनच करता आल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्ताननं २२७ रन केले. यामुळे पाकिस्तानला ७४ रनची आघाडी मिळाली. न्यूझीलंडनं त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वॉटलिंगच्या ५९ रन आणि हेनरी निकोल्सच्या ५५ रनच्या मदतीमुळे २४९ रन केले. यामुळे पाकिस्तानला विजयासाठी १७६ रनचं आव्हान मिळालं. पण पाकिस्तानची टीम १७१ रनवर ऑल आऊट झाली आणि त्यांचा ४ रननं पराभव झाला.


अजहर अली-असद शफीकची पार्टनरशीप


पाकिस्ताननं रविवारी तिसऱ्या दिवसाच्या शेवटी एकही विकेट न गमावता ३७ रन केले होते. चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी १३८ रनची आवश्यकता होती. पहिल्या सत्रामध्ये पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. स्कोअर ४८ रन असताना इमाम उल हक(२७), मोहम्मद हफीज(१०) आणि हॅरीस सोहेलच्या रुपात पाकिस्ताननं ३ विकेट गमावल्या. यानंतर अजहर अली(६५) आणि असद शफीक(४५) यांनी ८२ रनची पार्टनरशीप करून पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी पाकिस्तानचा स्कोअर १३० रनपर्यंत पोहोचवला. पण शफीकची विकेट गेल्यानंतर लंच घोषित करण्यात आला.


लंचनंतर पाकिस्ताननं गमावल्या ७ विकेट


लंचनंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानचा स्कोअर ४ विकेटवर १३० रन एवढा होता. पाकिस्तानला विजयासाठी फक्त ४६ रनची आवश्यकता होती. पण न्यूझीलंडनं पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली. पाकिस्तानची १४७ रनवर पाचवी, १५४ रनवर सहावी आणि सातवी विकेट गेली. यानंतर १५६च्या स्कोअरवर यासीर शहा आणि १६४ च्या स्कोअरवर हसन अली आऊट झाले.


आता पाकिस्तानला विजयासाठी १२ रनची गरज होती. तर न्यूझीलंडला एक विकेट हवी होती. अजहर अली ६५ रनवर खेळत होता. पण पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या एजाज पटेलनं अजहर अलीला एलबीडब्ल्यू केलं आणि न्यूझीलंडला रोमहर्षक असा विजय मिळवून दिला.