कानपूर : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील याची न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला चांगली जाणीव आहे. 2016 मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी रविचंद्रन अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने देखील त्यांच्या ताफ्यात 2 स्पिनर्सचा समावेश केला आहे. 


न्यूझीलंडकडे दोन घातक स्पिनर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या कसोटीपूर्वी केन म्हणाला, "संपूर्ण मालिकेत स्पिनर्सची भूमिका निर्णायक असेल. अनेक संघांनी अशा आव्हानांचा सामना केला आहे आणि आमच्या अपेक्षा यापेक्षा वेगळ्या नाहीत. फिरकीची भूमिका महत्त्वाची असेल. अयाज आणि सोमरविले सारखे फिरकीपटू आमच्या गोलंदाजी आक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावतील. 


आम्ही विकेट घेण्यासाठी सर्व पद्धती वापरून पाहू त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचीही भूमिका असेल, असंही त्याने म्हटलंय.


विल्यमसन म्हणाला की, "भारतीय फिरकी गोलंदाजांची ताकद आम्हाला माहीत आहे आणि ते बऱ्याच काळापासून चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, त्यामुळे त्याचा दृष्टिकोनही इतरांपेक्षा वेगळा असेल."


विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची अनुपस्थिती न्यूझीलंडला विजयाचा प्रबळ दावेदार बनवते का, असं विचारले असता विल्यमसनने नकारार्थी उत्तर दिलं.


“मला वाटत नाही की आम्ही विजयाचे प्रबळ दावेदार आहोत. भारतीय क्रिकेटची ताकद ही त्याची डेप्थ आहे. हे आव्हान मोठं आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असंही विल्यमसन म्हणाला.