क्रिकेट वर्तुळात शोककळा, `या` दिग्गज क्रिकेटपटूचे निधन
क्रिकेट वर्तुळातून सर्वांत दु:खद बातमी समोर येत आहे.
मुंबई : क्रिकेट वर्तुळातून सर्वांत दु:खद बातमी समोर येत आहे. आयर्लंड विरूद्द वनडे सामन्यात व्यस्त असलेल्या न्यूझीलंड संघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयर्लंडला पराभूत करून हा संघ विजय साजरा करताना खेळाडूंना मोठा धक्का बसलाय. न्यूझीलंडच्या माजी कसोटी कर्णधाराचे निधन झाल्याची घटना घडलीय. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरलीय.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी फलंदाज बॅरी सिंक्लेअर यांचे सोमवारी निधन झाल्याची घटना घडलीय. ते 85 वर्षांचे होते. न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी बॅरी सिंक्लेअर यांच्या निधनाची माहिती दिली.
क्रिकेट बोर्डाचं ट्विट
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करून सिंक्लेअर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “न्यूझीलंडचे माजी फलंदाज आणि कर्णधार बॅरी सिंक्लेअर यांच्या निधनाने NZC दु:खी आहे. ते 85 वर्षांचे होते. वेलिंग्टनचा एक मजबूत फलंदाज, बॅरीने 21 कसोटी सामने खेळले (3 कर्णधार म्हणून), ज्यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध 3 शतके आहेत.
पाकिस्तानात ठोकलं शतक
बॅरी सिंक्लेअर यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1936 रोजी वेलिंग्टन येथे झाला. तो उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज होता. सिंक्लेअरने 1963 मध्ये इंग्लंडविरुद्ध ऑकलंड कसोटीत पदार्पण केले. मात्र, त्याची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन डावात त्याला केवळ 26 धावा करता आल्या. पण त्यानंतर त्याने काही उत्कृष्ट खेळी केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 138 धावा केल्या होत्या. सिंक्लेअरने लाहोरमध्ये पाकिस्तानच्या भक्कम गोलंदाजीविरुद्ध चांगली खेळी केली आणि 130 धावा ठोकल्या होत्या.
हजार धावा करणारा तिसरा बॅटसमन
न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता. मात्र, भारताविरुद्ध त्याची कामगिरी कधीच अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. त्याने भारतासोबत खेळलेल्या 4 कसोटी सामन्यात केवळ 79 धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी 1968 मध्ये ऑकलंडमध्ये भारताविरुद्ध खेळली गेली, जिथे त्याला दोन्ही डावात केवळ 32 धावा करता आल्या.
सिंक्लेअरने आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 21 कसोटी सामन्यांमध्ये 3 शतके आणि 3 अर्धशतके आणि 29 च्या सरासरीने 1148 धावा केल्या आहेत.