`कोरोना`चा धोका टाळण्यासाठी भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये हस्तांदोलन नाही
कोरोना व्हायरसच्या सावटाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या सावटाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम हस्तांदोलन करणार नाही, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी दिली आहे.
भारत दौऱ्यामध्ये आम्ही सगळ्यांशी ठराविक अंतर ठेवूनच असणार आहोत. संभाव्य आजारापासून काळजी घेण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे, असं मार्क बाऊचर म्हणाला.
भारत दौऱ्यामध्ये आम्हाला योग्य सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे आणि आमची मेडिकल टीमही सोबत आहे. जर त्यांना काही धोकादायक वाटलं, तर ते आम्हाला बाहेर काढू शकतात. मेडिकल टीमने आम्हाला काळजी कशी घ्यायची, याबाबत माहिती दिली आहे, असं वक्तव्य मार्क बाऊचरने केलं आहे.
१२ मार्चला धर्मशालामध्ये पहिली वनडे झाल्यानंतर १५ तारखेला लखनऊ आणि १८ तारखेला कोलकात्यामध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेच्या मॅच होतील. ही सीरिज संपल्यावर आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या आयोजनावर मात्र कोरोना व्हायरसमुळे संकट ओढावलं आहे.
भारतीय टीम
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल