मुंबई : दहशतवादाला थारा देणाऱ्या देशाविरोधात कोणत्याच प्रकारचे संबंध ठेवू नये तसेच, त्यांच्या सोबत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येऊ नये, अशा मागणीचे पत्र बीसीसीयआयने आयसीसीला लिहीले होते. पण यात पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला नव्हता. याबाबतीत जेव्हा बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांना विचारणा करण्यात आली तेव्हा, या संदर्भात मी कोणतेच पत्र लिहीले नाही, असे म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणातून काढता पाय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने आयसीसीला पाकिस्तानसोबत असलेले संबंध तोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. पण ही मागणी आयसीसीने फेटाळली. यासंदंर्भातील निर्णय आयसीसी घेऊ शकत नाही, संबंध तोडायचे की नाही याबाबतचा निर्णय हा सरकारने घ्यावा, असे स्पष्टीकरण आयसीसीसीकडून देण्यात आले. आयपीएलच्या एका पत्रकार परिषदेसाठी अमिताभ चौधरी हे काल (४ मार्च) उपस्थित होते. यावेळी त्यांना पत्रात पाकिस्तानच्या उल्लेखाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली. आणि हे पत्र मी लिहिले नसल्याचे सांगितले.


'बीसीसीआयच्या सर्वेसर्वांनी आयसीसी सोबत दोन विषयांवर चर्चा केली होती. खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबतच्या आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या  देशासोबत संबंध न ठेवण्याचा होता. तसेच दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या देशासोबत इतर क्रिकेट टीमने संबंध ठेवावा का, हा दुसरा मुद्दा होता. पण यामध्ये पाकिस्तानच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नव्हता.


सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी आयसीसीला पत्र लिहिलं होतं. या पत्रात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांविरुद्ध क्रिकेट खेळलं जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. 


येत्या २३ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यानंतर काही दिवासांनीच वर्ल्ड कप सुरु होत आहे. वर्ल्ड कपमध्ये आयपीएलच्या खेळाचा फटका बसु नये, यासाठी काही प्रमुख खेळाडूंना आयपीएल मधील मोजक्याच मॅच खेळता येणार आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा चौधरी म्हणाले की, 'खेळाडूंवर असलेल्या दबावाचा मुद्दा विचाराधीन आहे.' 


अमिताभ चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे आयपीएल दरम्यान भारताच्या प्रमुख खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता बळावली आहे. याचबरोबर यंदाच्या वर्षी आयपीएलचे सामने ८ ऐवजी ७ वाजता सुरु करण्याचा विचार असल्याचे संकेतही अमिताभ चौधरी यांनी दिले. मागच्या वर्षी प्ले ऑफ आणि फायनलचे सामने रात्री ८ ऐवजी एक तास लवकर ७ वाजता सुरु झाले होते. पण ८ वाजता सुरु होणारे सामने ७ वाजता घेतले तर दुपारी ४ वाजता होणाऱ्या सामन्यांच्या वेळाबाबतही विचार करावा लागेल, असं अमिताभ चौधरी म्हणाले.