मँचेस्टर : तो virat kohli विराट कोहली असता तर सर्वांनीच त्याची प्रशंसा केली असती, त्याची चर्चा झाली असती असं वक्तव्य करत इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी बाबर आझम या खेळाडूची प्रशंसा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या संघाविरोधात ओल्ड ट्रफर्ड मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळलेल्या दमदार खेळीच्या बळावर पाकिस्तानच्या बाबरला ही दाद मिळाली. शान मसूदसह बाबरनं ९६ धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढलं. यामध्ये त्यानं स्वत:च्या खात्यात १०० चेंडूंमध्ये ६९ धावांचीही भर टाकली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ यांच्या बरोबरीनंच बाबरनंही खेळाचं प्रदर्शन केलं आहे. त्यामुळं या पाकिस्तानी खेळाडूचीही दखल घेतली पाहिजे असा सूर हुसैन यांनी आळवला. 


'स्काय स्पोर्ट्स'शी संवाद साधताना ते म्हणाले, 'ही फार लाजिरवाणी बाब आहे आणि सोबतच पाकिस्तानबाहेर खेळण्याचाही हा परिणाम आहे. जिथं कोणी नाही, अशा यूएईमध्ये खेळण्यामुळंही पाकिस्तान जणू भारतीय क्रिकेटच्या सावलीमध्ये झाकोळून गेला. तिथं न जाणं, आयपीएल न खेळणं, भारतात न खेळणं....' हुसैन यांनी वस्तुस्थिती सर्वांपुढं ठेवली. 


'हा मुलगा आज विराट कोहली असता तर, प्रत्येकजण त्याच्याबाबत चर्चा करत असतं. पण, तो बाबर आझम आहे त्यामुळं त्याची तितकी चर्चा होत नाही आहे. २०१८ पासून कसोटी सामन्यांमध्ये ६८ आणि निर्धारित षटकांच्या सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीनं तो खेळला आहे. तरुण खेळाडू म्हणून तो चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत आहे. त्याची तितची पात्रताही आहे. सर्वजण फॅब 4 चीच चर्चा करत आहेत. पण, हे तर फॅब 5 आहे आणि यात बाबर आझम आहे', असं हुसैन म्हणाले. 



बाबरची खेळी पाहून आणि जेम्स एँडरसन, जोफ्रा आर्चर, स्ट्रुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स या गोलंदाजांचा सामना करण्याची त्याची शैली पाहून नासिर हुसैन चांगलेच प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी, त्यांनी विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रुट अशा खेळाडूंच्या यादीत बाबर आझमचीही गणती केली.