मुंबई : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकावरून बीसीसीआय नाराज झाली होती. स्पर्धेचं आयोजन करताना आशियाई क्रिकेट परिषदेनं डोकं वापरलंय का असा बोचरा सवाल बीसीसीआयनं केला आहे. आशिया कपच्या वेळापत्रकानुसार भारताला १८ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर असे दोन दिवस मॅच खेळायचा आहेत. यातला १९ तारखेचा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. पहिली मॅच झाल्यानंतर विश्रांतीसाठी एकही दिवस नसताना दुसऱ्या दिवशी पाकिस्तानविरुद्धची मॅच का ठेवण्यात आली. या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या या भूमिकेवर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्सनं बोचरी टीका केली आहे. लागोपाठ दोन दिवस क्रिकेट खेळून कोणी मरत नाही, असं डीन जोन्स म्हणालाय. आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा अनेक वेळा लागोपाठ दोन दिवस मॅच खेळावी लागली होती. इंग्लंड दौऱ्यावर असताना आम्हाला तीन वेळा लागोपाठ ११ दिवस मॅच खेळायला लागली होती. खेळाडूंना याबाबत तक्रार का आहे. युएईमध्ये गरमी जास्त असेल हे मला माहिती आहे पण आता खेळाडूंना पैसे मिळत आहेत, असं वक्तव्य जोन्सनं केलं आहे.


लागोपाठ दोन दिवस क्रिकेट खेळण्यात मला काहीच अडचण वाटत नाही. थकवा ही एक समस्या असू शकते. पण सध्याचे भारतीय खेळाडू फिट आहेत. कोणीही मरणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जोन्स यांनी केलं आहे. १५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे.


जोन्सची वादग्रस्त वक्तव्य


डीन जोन्सनं याआधीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना जोन्सनं हाशिम आमलाचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. यानंतर मॅचचं प्रसारण करणाऱ्या टीव्ही चॅनलं जोन्ससोबतचा करार रद्द केला होता.


असा होणार आशिया कप


भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आशिया कप क्वालिफायर जिंकणारा देश अशा ६ टीम आशिया कपमध्ये सहभागी होतील. या ६ टीमचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा देश ग्रुप ए मध्ये आणि बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान ग्रुप बी मध्ये आहेत.


प्रत्येक ग्रुपमधील २-२ टीम अशा एकूण ४ टीम सुपर ४ मध्ये जातील. सुपर-४ मध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल आणि सुपर-४ मधल्या टॉप २ टीम फायनलमध्ये खेळतील. २८ सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवण्यात येईल.