माऊंट मॉनगनुई  : भारतीय पुरुष संघासोबतच महिला संघाने देखील आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ८ विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १६२ रनचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने केवळ २ विकेटच्या मोबदल्यात पार केले. 

 


 

भारताची सुरुवात फार निराशाजनक झाली होती. पहिल्या १५ रनमध्येच भारताचे २ विकेट गेले होते. पण यानंतर स्मृती मानधना आणि  कॅप्टन मिताली राजने  भारताचा डाव सांभाळला. तसेच भारताच्या विजयाचा पाय रचला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी  विजयी १५१ रनची विजयी भागीदारी झाली. 

 

पहिल्या मॅचमध्ये शतक झळकावलेल्या सांगलीच्या स्मृती मानधनाने या मॅचमध्ये देखील आपली कामगिरी कायम ठेवत  नाबाद ९० रन केल्या.  तर त्याखालोखाल कॅप्टन मिताली राजने नाबाद ६३ धावांची खेळी केली.  या विजयासोबतच महिला संघाने ३ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये २-० अशी निर्विवाद आघाडी घेत सीरिज देखील जिंकली आहे.  

 

याआधी टॉस जिंकत भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंग करायला आलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमध्ये तानिया भाटियाने पहिला झटका दिला. तिने झुलन गोस्वामीच्या हाती सुझी बेट्सला कॅच आऊट केले.  यानंतर नियमित वेळेने भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटके दिले. 

 

न्यूझीलंडकडून सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली. सहाव्या विकेटसाठी  कॅप्टन ऍमे सॅतरवेट आणि  लेग कॅस्पेरेक यांच्यात ही भागीदारी झाली. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ७१ रनची खेळी कॅप्टन ऍमे सॅतरवेटने केली. तसेच लेग कॅस्पेरेने २१ धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावांचा टप्पा भारतीय बॉलर्सने गाठू दिला नाही.  

 

न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. न्यूझीलंडची संपूर्ण इनिंग अवघ्या १६१ धावांत आटोपली. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट झुलन गोस्वामीने घेतल्या. तर पुनम यादव, दीप्ती शर्मा आणि एकता बिष्ठने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शिखा पांडेला १ विकेट मिळाली.