ODI World Cup 2023: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच राडा, पाकिस्तानी मंत्र्याने भारताला दिली धमकी, म्हणाला `जर तुम्ही...`
ODI World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपची (ODI World Cup) घोषणा झाली असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघ (Pakistan Cricket Team) सहभागी होणार आहे की नाही याबद्दल अद्याप संशय कायम आहे. यादरम्यान, पाकिस्तानी क्रीडामंत्री अहसान मजारी (Ehsaan Mazari) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
ODI World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपची (ODI World Cup) घोषणा झाली असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघदेखील (Pakistan Cricket Team) सहभागी होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सरकारच्या परवानगीनंतर आपला संघ भारतात जाईल असं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान, पाकिस्तानी क्रीडामंत्री अहसान मजारी (Ehsaan Mazari) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. जर भारतीय संघ आशिया कपमध्ये पाकिस्तानमध्ये आला नाही, तर आपला देशही वर्ल्ड कपसाठी भारतात जाणार नाही असं ते म्हणाले आहेत.
अहसान मजारी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे की "हे माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. जर भारताने आशिया कपमधील सामन्यात पाकिस्तानात न खेळता इतर ठिकाणी सामना खेळला तर आम्हीदेखील आगामी वर्ल्ड कपमध्ये अशीच मागणी करु".
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गठीत केलेल्या उच्चस्तरीय कमिटीने केलेल्या विधानानंतर अहसान माजारी यांनी हे विधान केलं आहे. हीच उच्चस्तरीय कमिटी पाकिस्तानी संघ सहभागी होणार आहे की नाही यासंदर्भात निर्णय घेणार आहे.
शहबाज शरीफ यांनीच गठीत केली आहे समिती
अहसान मजारी यांनी सांगितलं आहे की, "या कमिटीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मी उर्वरित 11 मंत्र्यांपैकी एक आहे. आम्ही या मुद्द्यावर चर्चा करु आणि शिफारशी पंतप्रधानांकडे सोपवू".
शहबाज शरीफ यांनी गठीत केलेल्या समितीमध्ये परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी, क्रीडा मंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमान कैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश आहे. संबंधित मंत्र्यांनी आधीच संकेत दिले आहेत की, एक उच्चस्तरीय प्रतिनीधीमंडळ भारतात जाऊन पाकिस्तान ज्या ठिकाणी खेळणार आहे त्या मैदानांची पाहणी करेल.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असल्याने क्रिकेटविश्चाचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तान संघ हैदराबादमध्ये अभ्यास सामने खेळणार असून, तिथेच त्यांचा नेदरलँड आणि श्रीलंकेशी सामना होणार आहे. पाकिस्तान संघ चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्येही सामने खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरोधात खेळतात.
आशिया कपचं वेळापत्रक अद्याप जाहीर नाही
आशिया कपचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. पण हे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे यावर सहमती झाली आहे. भारताचे सर्व सामने पाकिस्तानात होतील असं बोललं जात आहे. बीसीसीआयने आधीच आपला संघ पाकिस्तानात जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
मजारी यांनी आपण या हायब्रीड मॉडेलच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. "पाकिस्तान यजमान आहे. त्यामुळे सर्व सामने पाकिस्तानात आयोजित करण्याचा अधिकार आहे. क्रिकेटप्रेमींचीही अशीच इच्छा आहे. मला हायब्रीड मॉडेल अजिबात पसंत नाही," असं ते म्हणाले आहेत.
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत आशिया कप खेळवला जाणार आहे. 6 संघांमध्ये एकूण 13 सामने होणार आहेत. यामध्ये फायनलचाही समावेश आहे, जो श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. यामधील 4 सामने पाकिस्तानात, तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. पण पाकिस्तानात होणारे हे 4 सामने कोणते असतील हे स्पष्ट झालेलं नाही.