U19 Asia Cup 2021 : भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाने यश धुलच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या अंडर 19 संघाचा 9 गडी राखून पराभव केला आणि आशिया कप 2021 चे विजेतेपद पटकावले. 2021 च्या शेवटच्या दिवशी, भारतीय अंडर-19 संघाने आशियाई चॅम्पियन बनून संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण अनुभवायला दिला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा प्रवास अतिशय नेत्रदीपक होता आणि अखेर हा संघ चॅम्पियन ठरला. भारतीय अंडर-19 संघाने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले. मात्र, 2012 साली भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते ठरले. (India vs Sri lanka U19 Asia cup 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यातील भारताची कामगिरी


UAE मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि श्रीलंकेने 38 षटकात 9 बाद 106 धावा केल्या. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 38 षटकांचा करण्यात आला आणि त्यानंतर भारताला विजयासाठी 102 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने हे लक्ष्य सहज गाठले आणि चॅम्पियन ठरला. 


श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या डावात खराब कामगिरी केली आणि संघासाठी सर्वोत्तम धावा करणाऱ्या याशिरू रॉड्रिगोने नाबाद 19 धावा केल्या. भारताकडून विकी ओसवालने तीन बळी घेतले, तर कौशल तांबेला दोन यश मिळाले. याशिवाय राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.


पावसामुळे भारताला 38 षटकांत विजयासाठी 102 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताची पहिली विकेट 5 धावांवर बाद झालेल्या हरनूर सिंगच्या रूपात पडली. यानंतर आंगक्रिश रघुवंशीने नाबाद 56 आणि शेख रशीदने नाबाद 31 धावा करत भारताला 9 विकेटने विजय मिळवून दिला. भारताने 21.3 षटकात 1 गडी गमावून 104 धावा करून सामना जिंकला. आंगक्रिशने चौकार मारून भारताला चॅम्पियन बनवले.


भारताने आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले


1989 मध्ये बांगलादेशमध्ये प्रथमच अंडर-19 आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि पहिल्या सत्रात भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. यानंतर 2003 मध्येही भारताने विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर 2012 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, परंतु सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2013-14, 2016, 2018 आणि 2019 मध्येही भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आणि आता 2021 मध्येही भारताने हे यश मिळवले आहे.