Pakistan Vs England : इंग्लंडचा संघ सध्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तानात खेळत आहे. दुसरा कसोटी सामना (PAK Vs ENG 2nd Test) आज मुल्तान येथे खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामन्याच्या काही तास आधी इंग्लंडचा संघ थांबलेल्या हॉटेलबाहेर गोळीबार (Firing near hotel) झाल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलपासून काही अंतरावर गोळीबाराचा आवाज ऐकण्यात आला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यामुळे भीतीचे सावट निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा संघ थांबलेल्या हॉटेलपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरच हा गोळीबार झाला आहे. सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र या गोळीबारामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातील बदलाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कोणतेही माहिती दिलेली नाही.


नेमकं काय घडलं?


दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी इग्लंडचा संघ सरावासाठी निघणार होता. त्याचवेळी हा गोळीबार झाला. हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. मात्र त्यांना कोणताही धोका नसल्याची ग्वाही स्थानिक अधिकाऱ्यांनी इग्लंडच्या संघाला  दिली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि चार जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक टोळीयुद्धातून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.



श्रीलंकेच्या संघावरही गोळीबार


दरम्यान, याआधीही पाकिस्तानात आलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. 2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करत गोळीबार केला होता. लाहोरमधील गद्दाफी मैदानाकडे जात असताना श्रीलंकेच्या बसवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये कोणत्याही खेळाडूचा गंभीर दुखापत झाली नव्हती.