`तुम्ही भारताला हरवलं तर मी...` बांगलादेश संघाला आश्वासन देणारी पाकिस्तानी अभिनेत्री आता म्हणते, `तुम्ही फारच...`
भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत एकदिवसीय वर्ल्डकपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 8 ओव्हर्स आणि 7 गडी राखत 257 धावांचं लक्ष्य गाठलं.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयरथ कायम सुरु आहे. बांगलादेशचा पराभव करत भारताने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. जबरदस्त गोलंदाजी, अचूक क्षेत्ररक्षण आणि तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. पुण्यात झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 257 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने भारताने 8 ओव्हर्स आणि 7 गडी राखत अत्यंत सहजपणे हे लक्ष्य गाठलं. विराट कोहलीने यावेळी आपलं 48 वं एकदिवसीय शतक ठोकलं. या विजयासह भारताने सेमी-फायनलमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
भारताच्या विजयानंतर बांगलादेशी क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. नाराज झालेल्यांमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवरीचाही समावेश आहे. याचं कारण तिने या सामन्याआधी एक पोस्ट शेअर केली होती. पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तिने बांगलादेश संघाला आवाहन करत एक आवाहन केलं होतं.
"इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढील सामन्यात बदला घेतील. जर बांगलादेशने भारताचा पराभव केला तर मी ढाकाला जाईन आणि बंगाली मुलासह फिश डिनर डेटला जाईन," असं सेहरने एक्सवर म्हटलं होतं. यानंतर तिची पोस्ट व्हायरल झाली होती. पण सेहरची इच्छा काही पूर्ण झाली नाही. भारताने पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशचाही लाजिरवाणा पराभव केला. यानंतर सेहरने नवी पोस्ट शेअर केली.
सेहरने एक नवी पोस्ट शेअर केली असून किमान तुम्ही भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर चांगलं आव्हान दिलंत असं कौतुक केलं. "बंगाली टायगर्स चांगले खेळले. किमान तुम्ही भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर आव्हान दिलं," असं सेहरने म्हटलं आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पहिल्या जोडीने 91 धावांची भागीदारी करत निर्णय सार्थ ठरवला होता. पण यानंतर बांगलादेशचे विकेट्स एकामागोमाग तंबूत परतत राहिले. अखेरच्या काही फलंदाजांच्या जोरावर बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 256 धावा केल्या. रवींद्र जाडेजा, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.
257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावा करत दमदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनेही 53 धावा ठोकल्या. यानंतर विराट आणि के एल राहुलने संघाला विजयापर्यंत नेलं. विराटने यावेळी 78 वं शतक ठोकलं. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.
"जड्डूकडून सामनावीराचा पुरस्कार खेचून घेतल्याबद्दल क्षमा. मला मोठं योगदान द्यायचं होते. मी विश्वचषकात अर्धशतक केले आहेत. पण मला यावेळी ही खेळी पूर्ण करायची होती अशा भावना विराटने व्यक्त केल्या आहेत.