Asia Cup 2022 : `....म्हणून हे वर्ष पाकिस्तानचं असू शकतं` ; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानच्या संघाने भारतालाही पराभूत केलं आहे, असंही या खेळाडूनं म्हटलं आहे
आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर 4 मध्ये पाकिस्तानच्या संघाने (Pakistan) भारताला पराभूत करत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानची आत्मविश्वास वाढला आहे. अशातच भारतीय संघाच्या एका माजी खेळाडूने पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेचा दावेदार असू शकतो असं म्हटलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) एक भविष्यवाणी केली आहे. यंदाच्या आशिया चषकाचे विजेतेपद पाकिस्तान जिंकेल,असा अंदाज सेहवागने बांधला आहे. आगामी सामना भारतासाठी जिंकणे महत्त्वाचे असल्याचे सेहवागने सांगितले. शेवटच्या सुपर 4 सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. भारताच्या पराभवानंतर, सेहवागने भाकीत वर्तवले की पाकिस्तान विजेता म्हणून उदयास येईल.
क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, "जर भारताने योगायोगाने दुसरा सामना गमावला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल. याचा पाकिस्तानला फायदा आहे, कारण जर त्यांनी एक सामना गमावला आणि दुसरा जिंकला तर त्यांचा नेट रन रेट त्यांना अंतिम फेरीत घेऊन जाईल. कारण त्यांनी एक सामना गमावला आहे आणि दोन जिंकले आहेत. भारताने एक सामना गमावला आहे आणि दुसरा गमावल्यास ते बाहेर पडतील. त्यामुळे भारतावर दबाव आहे."
"सर्व गणितं जुळून आली तर पाकिस्तान बऱ्याच वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारेल. बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानी संघाने भारतालाही पराभूत केलं आहे. त्यामुळे कदाचित हे वर्ष पाकिस्तानचं असू शकतं," असे विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.
2014 मध्ये पाकिस्तानने शेवटचा आशिया कप फायनल खेळला होता, जेव्हा त्यांना श्रीलंकेकडून पाच विकेटने पराभव पत्करावा लागला होता. एकूणच, भारताच्या सात आणि श्रीलंकेच्या पाचच्या तुलनेत पाकिस्तानने केवळ दोनदा आशिया कप जिंकला आहे.