विचित्र ट्रॉफीमुळे पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट ट्रोल
एक महिन्याआधी बिस्कीट ट्रॉफीमुळे ट्रोल झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुन्हा एकदा स्वत:चं हसं करून घेतलं आहे.
मुंबई : एक महिन्याआधी बिस्कीट ट्रॉफीमुळे ट्रोल झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुन्हा एकदा स्वत:चं हसं करून घेतलं आहे. कोणतीही स्पर्धा सुरु व्हायच्या आधी दोन्ही देशांचे कर्णधार ट्रॉफीचं अनावरण करतात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजआधी अशाच प्रकारे ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. ओए होए ट्रॉफी असं या ट्रॉफीचं नाव आहे. ट्रॉफीच्या अशा विचित्र नावामुळे क्रिकेट रसिकांनी पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटवर निशाणा साधला.
जाहिरातदारांकडून अशाप्रकारे ट्रॉफीचं नाव सुचवण्यावरही युजर्सनी टीका केली आहे. तसंच बिस्कीट ट्रॉफी आणि ओए होए ट्रॉफीनंतर पुढच्या ट्रॉफींची मिश्किल नावंही सुचवली आहेत.
काही युजर्सनी तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही ट्रोल केलं आहे.
क्रिकेट स्पर्धांची प्रतिष्ठा अशा नावांमुळे खराब होत असल्याचं मतही काही क्रिकेट रसिकांनी मांडलं आहे.
ही ट्रॉफी नाही तर एक मजाक आहे, असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
बिस्कीट ट्रॉफीवरूनही टीका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजदरम्यानही बिस्कीट ट्रॉफीमुळे पाकिस्तान क्रिकेट टीमला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तर खुद्द आयसीसीनंही पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला होता. या सीरिज दरम्यानच्या ट्रॉफीवर बिस्कीट लावण्यात आलं होतं.
ट्रॉफीवर बिस्कीट लावण्यात आलं असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं. खुद्द आयसीसीनंही ट्विटरवरून पीसीबीला चिमटा काढला. तुम्ही विरुद्ध ट्रॉफी, चिंता करण्याची काहीही गरज नाही, असं ट्विट आयसीसीनं केलं.
पाकिस्तानी क्रिकेट समर्थक आणि क्रीडा पत्रकारांनी आयसीसीच्या या ट्विटवर आक्षेप घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड अशाप्रकारे एखाद्या क्रिकेट बोर्डाची मस्करी कशी करू शकतं, असे सवाल पाकिस्तानी क्रिकेट फॅननी उपस्थित केले.
आयसीसीच्या या ट्विटला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही ट्विटरवरून उत्तर दिलं. पाकिस्तानच्या या ट्विटनंतरही त्यांच्यावर यूजर्सनी पुन्हा निशाणा साधला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ४ दिवसानंतर रिप्लाय केल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं.