खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.
मुंबई : आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला. मॅचआधी दोन्ही देशाचे क्रिकेट रसिक आपआपल्या टीमला पाठिंबा देत होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर पहिल्यांदाच या दोन्ही टीम एकमेकांना भिडणार होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाच्या जखमा भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांच्या मनात ताज्या होत्या. या जखमांवर मीठ चोळणारं एक ट्विट पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलं होतं. पण या ट्विटमुळे त्यांच्यावरच ट्रोल होण्याची वेळ आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर आयसीसीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा हा व्हिडिओ होता. मागच्या वेळी भारत-पाकिस्तान भिडले होते तेव्हा काय झालं होतं पाहा. हिरवा टी-शर्टवाले पुन्हा याची पुनरावृत्ती करतील का असा सवाल या ट्विटमधून विचारण्यात आला. पण हे ट्विट करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं इंग्रजी स्पेलिंग चुकवलं. या ट्विटमध्ये happened च्याऐवजी Hepoened लिहिलं होतं.
या एका चुकीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं. पाकिस्तानच्या खेळाडूंनाही अनेकवेळा त्यांच्या इंग्रजीसाठी ट्रोल करण्यात येतं. यावेळी मात्र यूजर्सनी थेट बोर्डावरच निशाणा साधला.