Champions Trophy 2025: आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर आता टीम इंडियाचं लक्ष असेल ते चॅम्पियन ट्रॉफीवर...  पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) आता बीसीसीआय आणि पीसीबी आमनेसामने आले आहेत. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही, असा स्पष्ट संदेश बीसीसीआयने (BCCI) धाडल्याने आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चवताळल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पीसीबीने एक अजब गजब मागणी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचे बीसीसीआयने लेखी उत्तर द्यावं, अस पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटलं आहे. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये 19 जुलैला आयसीसी परिषद होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत कोणते मुद्दे मांडले जातील, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बीसीसीआयसमोर पीसीबी पुन्हा एकदा झुकणार, असंच चित्र समोर येतंय.


दरम्यान, 2023 च्या वनडे आशिया चषकातही भारताचे सामने हायब्रिड मॉडेलवर श्रीलंकेत खेळले गेले. आशिया कपपूर्वी देखील बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड समोरासमोर आले होते. त्यावेळी देखील बीसीसीआयसमोर पीसीबीला गुडघे टेकावे लागले होते. अखेर भारताचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलवर श्रीलंकेत खेळवले गेले होते. अशातच आता पाकिस्तानला पुन्हा तडजोड करावी लागणार आहे.


टीम इंडियाचं वेळापत्रक


चॅम्पियन्स ट्रॉफीतलं टीम इंडियाचं वेळापत्रक समोर आलं आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारत-न्यूझीलंड आमने सामने असतील. ग्रुप स्टेजमधला टीम इंडियाचा शेवटचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी आणि यजमान पाकिस्तानशी असणार आहे. हा सामना 1 मार्चला खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे हे तीनही सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. 


चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन पाकिस्तानातल्या तीन शहरांमध्ये करण्यात आलं आहे. यात लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्ताव भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील, अशी माहिती समोर आली होती. मात्र, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याने पाकिस्तानची चांगलीच फजिती होऊ शकते.