`BCCI अहंकारी झालं आहे, जर त्यांनी IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं नाही तर...`, इम्रान खान यांचं मोठं विधान
Imran Khan on IPL: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) पाकिस्तानी क्रिकेटर्सना संधी दिली जात नसल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांनी नाराजी जाहीर केली आहे. इम्रान खान यांनी बीसीआयला (BCCI) फटकारलं असून ते आता फार अहंकारी झाल्याचं म्हटलं आहे.
Imran Khan on IPL: इंडियन प्रीमियर लीगला (IPL) धडाक्यात सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या आयपीएलमध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभाग होत असतात. या आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू लखपती, करोडपतीही झाले आहेत. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआय करोडोंची उलाढाल करत असतं. दरम्यान, आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यावर अद्यापही बंदी आहे. आणि यावरुनच पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी नाराजी जाहीर केली आहे.
जर भारत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देत नसेल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही असा सल्ला इम्रान खान यांनी देशातील क्रिकेटर्सना दिला आहे. 2008 मध्ये जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंनाही सहभागी करुन घेण्यात आलं होतं. पण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढल्याने पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली.
"भारतीय क्रिकेट बोर्ड पाकिस्तानी खेळाडूंवर राग (आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी न देत) काढत असल्याचं मला आश्चर्य वाटत आहे. हा एक अहंकाराचा भाग आहे," असं इम्रान खान यांनी Times Radio शी बोलताना म्हटलं आहे. "जर भारत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यापासून रोखत असेल तर पाकिस्तानने चिंता करण्याची गरज नाही," असा सल्लाही इम्रान खान यांनी दिला आहे.
बीसीआयकडे मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्याची क्षमता असल्याने त्यांच्यात अहंकार आला आहे, अशी टीका इम्रान खान यांनी केली आहे. "भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचे संबंध पाहता हे दुर्दैवी आहे. क्रिकेट विश्वात एक महाशक्ती असल्याप्रमाणे भारत वावरत असून त्यांच्या वागणुकीत फार अहंकार आहे," असं इम्रान खान म्हणाले आहेत.
आयपीएच्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. गतवर्षी गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.