अवघ्या १४ महिन्यांत हा पाकिस्तानी गोलंदाज बनला वर्ल्ड नंबर वन
पाकिस्तानी संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानने ४-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात पाकिस्तानच्या एका गोलंदाजाचा मोठा वाटा आहे.
दुबई : पाकिस्तानी संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानने ४-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात पाकिस्तानच्या एका गोलंदाजाचा मोठा वाटा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला पदार्पण होऊन अवघे १४ महिने झालेत मात्र आपल्या दमदार कामगिरीने त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेय. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवलेय.
हा पाकिस्तानी क्रिकेटर म्हणजे वेगवान गोलंदाज हसन अली. सध्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. यासोबतच आणखी एक रेकॉर्ड त्याने नावावर केलाय. वेगवान ५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे. हसन अलीने २४ सामन्यांत ५० विकेट घेतल्या आहेत.
१७ सामन्यांमध्ये ४३ विकेट
हसन अलीला क्रिकेटमध्ये पदार्पण करु १४ महिने झालेत. त्याने २०१६मध्ये आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या वर्षी तर हसनची कामगिरी जबरदस्त राहिलीये. त्याने केवळ १७ सामन्यांमध्ये ४३ विकेट घेतल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतलीये. यात हसन अलीने १२ विकेट घेतल्या. यात ३४ धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने १३ विकेट घेत प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा किताब पटकावला होता.