लाहोर : पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीची हत्या झाल्यामुळे खळबळ माजली आहे. पाकिस्तानच्या लरकाना भागामध्ये हा प्रकार घडला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये आंदोलन सुरु झालं आहे. या हत्याकांडानंतर सोशल मीडियावरून पाकिस्तानी नागरिकांनी या मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. या मोहिमेमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरी सामील झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी लरकानाच्या बीबी आसिफा डेंटल कॉलेजची विद्यार्थीनी असल्याचं सांगितलं जात आहे. या मुलीचं नाव नम्रता चंदानी आहे. नम्रताचा मृतदेह तिच्या हॉस्टेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला. यानंतर पाकिस्तानमध्ये 'जस्टिस फॉर नम्रता' अशी ऑनलाईन मोहीम सुरु झाली. शोएब अख्तरही या मोहिमेत सहभागी झाला आहे.


'तरुण मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं ऐकून खूप दु:ख झालं आहे. न्याय मिळेल आणि खरे गुन्हेगार पकडले जातील, अशी माझी अपेक्षा आहे. माझं हृदय प्रत्येक पाकिस्तानीसोबत धडकतं. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तिच्या आत्म्याला शांती मिळो,' असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.



पाकिस्तानच्या पोलिसांनी आत्महत्येची शक्यताही फेटाळून लावलेली नाही. आम्ही या प्रकरणाचा सगळ्या बाजूंनी तपास करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. तर आमची मुलगी आत्महत्या करु शकत नाही, तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप मुलीच्या कुटुंबाने केला आहे. मुलीचा भाऊ डॉ. विशाल सुंदर यांनी हा मोठा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.