ब्रिस्बेन : ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या टेस्ट मॅचमधून नसीम शाह या फास्ट बॉलरचं पदार्पण झालं आहे. नसीम शाह याचं वय १६ वर्ष सांगण्यात येत असलं तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ३१२/१ एवढा झाला आहे. नसीम शाहने १६ ओव्हरमध्ये ६५ रन दिले, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. शाहने डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली होती, पण हा नोबॉल असल्यामुळे वॉर्नरला जीवनदान मिळालं.


नसीम शाह हा ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर सगळ्यात लहान वयात टेस्ट क्रिकेट खेळणारा खेळाडू बनला आहे. नसीम शाह याने १६ वर्ष २७९ दिवसाचा असताना ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच खेळली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन क्रेग यांच्या नावावर होता. क्रेग यांनी १९५३ साली मेलबर्नमध्ये पहिली टेस्ट खेळली होती, तेव्हा त्यांचं वय १७ वर्ष होतं.


नसीम शाह याचं वय १६ वर्ष जरी सांगण्यात येत असलं तरी पाकिस्तानी वेबसाईट 'द डॉन'चा जुना लेख आता व्हायरल झाला आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू एण्डी रॉबर्ट्स यांचा हा लेख आहे. १६ वर्षाचा हा युवा फास्ट बॉलर मला फार आवडला आहे, असं एण्डी रॉबर्ट्स म्हणाले होते. ७ ऑक्टोबर २०१६ सालचा हा लेख आहे. आता २०१९ साली म्हणजेच ३ वर्षानंतरही नसीम शाह १६ वर्षांचाच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे.


पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादीक यांचंही २०१८ सालचं एक ट्विट समोर आलं आहे. 'पाकिस्तान सुपर लीगच्या क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या १७ वर्षांच्या नसीम शाह याच्या पाठीला दुखापत झाली आहे. तो सरावासाठी परतला आहे. पीएसएलच्या चौथ्या मोसमासाठी तो फिट होण्याची अपेक्षा आहे', असं ट्विट साज सादीक यांनी केलं होतं.


साज सादीक यांचं हेच ट्विट मोहम्मद कैफने रिट्विट करुन निशाणा साधला आहे. भविष्य चांगलं वाटत आहे, पण तो १६ सध्या वर्षांचा आहे. वयाने तो लहान होतोय, असा टोमणा कैफने लगावला आहे.



पाकिस्तानी खेळाडूंवर वय चोरण्याचा आरोप याआधीही झाला आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रातरही आपण वय चोरल्याचं मान्य केलं आहे. शाहिद आफ्रिदीने वयाच्या १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण पदार्पण केलं तेव्हा आपलं वय १९ वर्ष होतं, असं आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे.


शाहिद आफ्रिदीच्या काळात सोशल मीडिया नसल्यामुळे या गोष्टी समोर आल्या नाहीत. पण आता सोशल मीडिया प्रभावी असल्यामुळे नसीम शाहचं बिंग फुटलं आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यावर कारवाई करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.