पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये कधी कर्णधार बदलला जातो तर कधी निवडकर्त्यांना बाद केले जाते. अशा अनेक प्रकारची नाटकं नेहमीच बघायला मिळतात. दरम्यान पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका पत्रकाराकडून  मसूदचा अपमान झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पीसीबीच्या पत्रकार परिषदेत ही घटना घडली. 


नक्की काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कसोटी कर्णधारपदी कायम ठेवल्यानंतर मसूदची मीडियाशी पहिलीच भेट होती. या पत्रकार परिषदेत पीसीबी आणि निवड समितीवर टीका करण्यात आली. अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात असल्याचीही चर्चा झाली.  काही युवा खेळाडूंकडेही दुर्लक्ष केले जात आहे असेही बोलले गेले. याच दरम्यान बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध पाकिस्तान संघाने मायदेशात दोन कसोटी सामन्यांची मालिका 0-2 अशी गमावल्याचा राग एका पत्रकाराला होता. एवढं सगळं होऊनही पीसीबीने आपला कर्णधार बदलला नाही किंवा शान मसूदने कर्णधारपद सोडण्याचा कोणताही विचार दर्शविला नाही याचा राग पत्रकाराला होता. 


एका पत्रकाराने शान मसूदला विचारले की, “शान, तू म्हणालास की जोपर्यंत पीसीबी तुला संधी देत ​​आहेत तोपर्यंत तू कर्णधारपद ठेवशील. पण तुझे मन तुला सांगत नाही का की तू हरत आहेस, परफॉर्म करत नाहीस आणि हे पद सोडून द्यावे?" या प्रश्नामुळे नाराज झालेल्या मसूदने थेट पीसीबीचे मीडिया आणि कम्युनिकेशन डायरेक्टर समी उल हसन यांच्याकडे पाहिले. हसनने हसतमुखाने परिस्थिती हाताळली. शान मसूदने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. 


या घडलेल्या घटनेवरून दिसून येते की, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पीसीबीने शान मसूदला कर्णधारपदी कायम ठेवल्याचा राग या पत्रकाराला होता हे दिसून येत होते. 


 



समी उल हसन यांनी पत्रकारांना फटकारले


"माझी शेवटची नम्र विनंती आहे... पाकिस्तानचा कर्णधार बसला आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण कृपया आदर दाखवा... तुम्ही पाकिस्तानच्या कर्णधाराला विचारलेला प्रश्न विचारण्याचा हा योग्य मार्ग नव्हता." या शब्दात पत्रकार परिषद संपल्यानंतर समी उल हसनने पत्रकारांना फटकारले. 


सिलेक्टर मोहम्मद युसूफ यांचा राजीनामा 


पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध निवडलेल्या संघात बांगलादेशविरुद्ध उत्तम कामगिरी न करता आलेल्या खेळाडूंनाही संधी दिली आहे. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. यामुळे प्रचंड गदारोळ झाला. याच कारणांमुळे पाकिस्तानचे सिलेक्टर मोहम्मद युसूफ यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.