Babar Azam About Team India: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने बुधवारी आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये नेपाळविरुद्ध 238 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताचा उल्लेख केला. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाबरने पहिल्याच सामन्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताचा उल्लेख केला आहे. भारताविरुद्धच्या बहुप्रतीक्षित सामन्याआधी नेपाळविरुद्ध मिळवलेला हा विजय संघाला नक्कीच आत्मविश्वास देईल, असं बाबर म्हणाला आहे. पाकिस्तानचा पहिलाच सामना अ गटातील दुबळ्या नेपाळच्या संघाविरोधात झाला. हा सामना पाकिस्तानने 238 धावांनी जिंकला. पाकिस्तान आता भारताविरुद्ध पल्लेकेले येथील मैदानावर भारताविरुद्ध खेळणार असून यासाठी पाकिस्तानी संघ आज श्रीलंकेला रवाना होणार आहे.


पुढेही असाच खेळ करायचा आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया चषक स्पर्धेला विजयासहीत सुरुवात केल्यानंतर बाबर आझमने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान भारताचा उल्लेख केला. "हा सामना भारताविरुद्धच्या सामन्याआधी एक उत्तम सराव ठरला. या सामन्यातून आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के कामगिरी करायची आहे. पुढेही आम्ही अशीच कामगिरी करु अशी अपेक्षा आहे," असं बाबर सामना संपल्यानंतर म्हणाला. बाबरने स्वत: 151 धावांची खेळी केली. हे बाबरचं एकदिवसीय क्रिकेटमधील 19 वं शतक ठरलं. इफ्तिकार अहमदने नाबाद 109 धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक झळकावलं. पाकिस्तानी संघाने या सामन्यामध्ये 342 धावांचा डोंगर उभा केला. 


अर्ध्या ओव्हर्स खेळता आल्या नाहीत


343 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला नेपाळचा संघ अर्ध्या ओव्हर्सही खेळू शकला नाही. नेपाळचा संपूर्ण संघ 23.4 ओव्हरमध्ये 104 धावांवर तंबूत परतला. "मी जेव्हा खेळपट्टीवर होतो तेव्हा मला काही चेंडू समजून घ्यायचे होते. चेंडू फलंदाजाकडे एका समान वेगाने येत नव्हता. मी रिझवानबरोबर पार्टनरशीप केली. त्याचा सामन्यावर मोठा प्रभाव पडला. मी आणि रिझवान एकमेकांना प्रोत्साहन देत खेळत होतो," असं बाबर म्हणाला.


मी कामगिरीवर समाधानी


"इफ्तिकार अहमद फलंदाजीला आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. त्याने फार सुरेख फलंदाजी केली. 2-3 चौकार लगावल्यानंतर त्याला सूर गवसला," असं म्हणत बाबरने इफ्तिकार अहमदचं कौतुक केलं. "मी या कामगिरीमुळे समाधानी आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली," असंही बाबर संघाच्या प्रदर्शनाबद्दल विश्लेषण करताना म्हणाला.


भारतीय संघ श्रीलंकेत दाखल


भारतीय संघही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये दाखल झाला आहे.



भारत, पाकिस्तान आणि नेपाळचा संघ अ गटामध्ये असून साखळी फेरीत हे तिन्ही संघ एकमेकांविरोधात प्रत्येकी एक सामना खेळणार आहे.