पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिरची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती
वयाच्या २७ व्या वर्षी टेस्टमधून निवृत्ती
लाहोर : पाकिस्तानचा वेगवान बॉलर मोहम्मद आमिरने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मोहम्मद आमिरने म्हटलं आहे. मोहम्मद आमिरने २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याने ६ ओव्हरमधून २ ओव्हर मॅडेन टाकल्या होत्या. तर १६ रनच्या बदल्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यासारख्या तगड्या खेळाडूंना माघारी पाठवले होते.
काय बोलला आमिर ?
'क्रिकेटच्या पारंपरिक म्हणजेच टेस्ट प्रकारात आपल्या टीमचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानास्पद बाब आहे. मी या टेस्ट फॉरमेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमिर म्हणाला. 'मी वनडे आणि टी-२० क्रिकेटकडे अधिक लक्ष देणार आहे'. आमिरने आपल्या टीममधील खेळाडूंचे आभार मानले आहेत. टेस्टमध्ये खेळण्याची संधी दिली म्हणून त्याने टीम मॅनेजमेंटचे देखील आभार आभार मानले.
मोहम्मद आमिरने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध पदापर्ण केले होते. दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३६ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. या ३६ टेस्टमध्ये त्याने ११९ विकेट घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरची टेस्ट मॅच त्याने या वर्षी ११ जानेवारीला दक्षिण आफ्रिकविरुद्ध खेळला होता.
वादग्रस्त कारकिर्द
मोहम्मद आमिरची टेस्ट कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने मोहम्मद आमिरवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.