पाकिस्तान क्रिकेट सध्या प्रत्येक पातळीवर आव्हानांचा सामना करताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरोधातील मालिका खेळत असून, यावेळी लाजिरवाणी कामगिरीमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाचा चौथ्या टी-20 सामन्यात 4 धावांनी दारुण पराभव झाला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये हा सामना झाला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला होता. पण न्यझीलंडने उर्वरित 2 सामने जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता लाहोरमध्ये होणारा अंतिम सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडने पाकिस्तान संघासमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अखेरच्या षटकात पाकिस्तानला 18 धावांची गरज होती. जेम्स निशमला पहिल्या चेंडूवर चौकार लगावत पाकिस्तानने विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण जेम्सने अष्टपैलू कामगिरी करत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. यासह पाकिस्तान संघाच्या चाहत्यांची निराशा झाली. 


पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. पण 4 धावांनी पाकिस्तानने हा सामना गमावला. पराभवानंतर पाकिस्तानी चाहते फार नाराज झाल्याचं दिसत होतं. यावेळी एक चिमुरडा तर ढसाढसा रडत होता. स्क्रीनवर मुलाला रडताना पाहून इतर प्रेक्षकही भावूक झाले होते. 



या सामन्यात न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज टीम रॉबिन्सनने अर्धशतक ठोकलं. त्याच्या जोरावर न्यूझीलंडने 7 विकेट गमावत 178 धावा केल्या. यानंतर गोलंदाज विलियमने 27 धावा देत 3 विकेट मिळवत पाकिस्तान संघाला 174 धावांवर रोखलं. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल ब्रेसवेलने आपल्या संघाने डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केल्याचं कौतुक केलं. 


ब्रेसवेलने सामन्यानंतर सांगितले की, “आम्ही नवीन खेळाडूंना समोर आणण्यास सक्षम आहोत, ही आमच्यासाठी खूप सकारात्मक बाब आहे, आम्ही ती आव्हानात्मक षटके टाकण्यासाठी निशमला पाठिंबा दिला आणि त्याने चांगली कामगिरी केली. माझ्या मतं गोलंदाजी म्हणून आमची शेवटची पाच षटके विशेषतः प्रभावी होती”.


न्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक महत्वाचे खेळाडू संघातून बाहेर आहेत. 


पाकिस्तानच्या व्यवस्थापनाने शाहीन आफ्रिदीनंतर पुन्हा एकदा बाबर आझमकडे नेतृत्व सोपवलं आहे. शाहीन आफ्रिदीकडे फक्त एका मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आलं. शाहीनला न्यूझीलंडविरोधातील त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात 0-5 असा पराभव पत्करावा लागला होता.