INDvsPAK:पाकिस्तानच्या चाचांचं भारतीय टीमच्या फॅनला गिफ्ट
खेळ आणि कलेला सीमांचं आणि देशाचं बंधन नसतं असं म्हणतात.
दुबई : खेळ आणि कलेला सीमांचं आणि देशाचं बंधन नसतं असं म्हणतात. आशिया कपमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचसाठीही असंच काहीसं पाहायला मिळालं. आशिया कपचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट टीमचा फॅन सुधीर गौतमकडे भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी दुबईला जायचे पैसे नव्हते. पाकिस्तान टीमचे फॅन मोहम्मद बशीर उर्फ चाचा शिकागो यांना ही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी सुधीर गौतमला युएईला जाऊन मॅच पाहण्याची सोय केली. तू फक्त युएईला ये, बाकीचं सगळं मी पाहतो, असं चाचा सुधीरला म्हणाले. मी काही फार श्रीमंत नाही, पण माझं मन मोठं आहे. जर मी कोणाची मदत केली तर अल्लाह खुश होईल, अशी प्रतिक्रिया चाचांनी दिली.
आशिया कप सुरु होण्याआधी सुधीर गौतमनं काही जुने फोटो ट्विट केले होते. यामध्ये पाकिस्तानचे चाचा शिकागो, बांगलादेशचा फॅन शोएब टायगर दिसत आहेत. क्रिकेटला देशांचं बंधन नसतं, असं सुधीर या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
सुधीर गौतम हा बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. क्रिकेटसाठी त्यानं घरही सोडलं आहे. पहिले तो सचिनचा सर्वात मोठा फॅन होता. सचिनच्या निवृत्तीनंतर सुधीर भारतीय टीमचा फॅन बनला आहे. सुधीर मॅचवेळी शरीरावर भारतीय तिरंगा रंगवतो. पाठीवर 'मिस यू सचिन' असं लिहितो. अनेक वेळा परदेशातल्या मॅच पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरनं सुधीर गौतमला तिकीट काढून दिलंय.