मुंबई : टी -20 विश्वचषकाला (T20 World Cup) काही दिवस बाकी असतानाच भारतीय संघात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. भारतीय संघात दोन कर्णधार असल्याचं बोललं जात असून विराट कोहलीकडे (Virat Kohli) कसोटी सामन्याचं तर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी शक्यता एका रिपोर्टनुसार वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने (Salman Butt) विराट कोहलीविरुद्ध डर्टी पॉलिटिक्स सुरु असल्याचा दावा केला आहे. भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यशस्वी ठरली आहे, त्यातच आता टी-20 विश्वचषकही तोंडावर आहे, अशा वेळी कर्णधारपदाचा वाद घालणं योग्य नसल्याचं सलमान बट याने म्हटलं आहे.


अनेक खेळाडू विराटच्या बाजूने


एकटा सलमान बटच नाही तर याआधीही अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनी विराट कोहलीच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. विराट कोहली संघाचं उत्तम व्यवस्थापन करत असून बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची घाई करु नये असं त्यांना वाटतं. भारतीय क्रिकेटच्या (Cricket of India) भल्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडावं असं काही जणांना वाटत असलं तरी कोहलीच्या नेतृत्वात भारतानं चांगलं यश मिळवलं आहे, आणि भविष्यात विराट कोहलीलाच कर्णधार म्हणून पाहायचं आहे असं मत काही क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. 


या यादीत सलमान बटचाही समावेश आहे. सलमान बटनने म्हटलं आहे, ही बातमी कोणत्या वेळी आली आहे हे तुम्ही पाहिलं का? क्रिकेट बोर्डाला काय वाटतं याबद्दल मला काही बोलायचं नाही, ती त्यांची स्वतःची विचारसरणी असू शकते. पण या सर्व गोष्टींवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे का? असा सवाल सलमान बट याने उपस्थित केला आहे. 


गलिच्छ खेळाचा हा एक भाग


इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने संघाचं चांगलं नेतृत्व केलं आहे, टीम निवडीवरुन विराटला टीकेला सामोरं जावं लागलं, पण त्याने या टीमबरोबर चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. हा संघ प्रत्येक फॉरमॅटमध्ये अव्वल आहे आणि विश्वचषक तोंडावर असताना अशा बातम्या येणं हा फक्त एका गलिच्छ खेळाचा भाग आहे, असं सलमान बट याने म्हटलं आहे.


रोहित शर्मादेखील एक चांगला कर्णधार आहे पण जेव्हा प्रत्येक फॉरमॅटमध्ये विजयाच्या टक्केवारीचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा विराट कोहली उजवा ठरतो. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जगभरात चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहीलने भारतीय क्रिकेटसाठी खुप केलं आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पसरवण्यामागे चांगला हेतू नसल्याचं मत सलमान बटने व्यक्त केलं आहे.


विराट आयसीसी स्पर्धांमध्ये ठरतोय अपयशी


विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या संघाचं नेतृत्व भारतीय संघाचा धडाकेबाज बॅट्समन हिटमॅन रोहित शर्माकडे जाऊ शकतं. टीम इंडियाचा कर्णधार कोहलीला आगामी टी -20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना आपलं कर्णधारपद वाचवण्याची शेवटची संधी असू शकते. एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात कोहलीला अपयश आलं आहे. त्यामुळे रोहिम शर्माच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.