पांड्या, राहुलला खेळू द्या, बीसीसीआयच्या कार्यकारी अध्यक्षांची मागणी
या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे पांड्या आणि केएल राहुल वर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर केएल राहुल या दोघांना न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवा, अशी विनंती बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी प्रशासन समितीकडे केली आहे. या विनंतीचे पत्र सी. के खन्ना यांनी समितीला पाठवले आहे.
हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे दोघे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी करण जोहरच्या "कॉफी विथ करण" या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी हार्दिक पांड्याने महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळे पांड्या आणि केएल राहुल वर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना करण्यात आलं होतं.
वाद वाढल्यानंतर या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन अर्ध्यातूनच माघारी बोलवण्यात आले होते. या कारवाईमुळे पांड्या आणि केएल राहुलला न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुकावे लागणार आहे. २३ जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्याला दोन्ही खेळाडूंना मुकावे लागू नये, यासाठी हा सर्व खटाटोप बीसीसीआयच्या कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी केला आहे. पांड्या-राहुल यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल या दोघांनी झालेल्या चुकीबद्दल बिनशर्त माफी देखील मागितली आहे. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागू नये. त्यांच्याबद्दल सहानभूती दाखवावी, अशी विनंती खन्ना यांनी प्रशासकीय समितीकडे केली आहे.
हा झाला परिणाम
पांड्या आणि केएल राहूलने केलेल्या टिप्पणीमुळे या दोघांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच या प्रकरणामुळे हे दोघे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातील ज्या भागात ही टिप्पणी केली होती, तो संपूर्ण भाग हॉटस्टारने आपल्या अॅपवरुन काढून टाकला. तसेच हार्दिक पांड्याला खार स्पोर्टस कल्बकडून देण्यात आलेले मानद सदस्यत्वपद काढून घेण्यात आले. पांड्या मिळणाऱ्या जाहिराती वर देखील या सर्व प्रकरणाचा परिणाम झाला आहे.
अधिक वाचा : पांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...