बापरे! एकट्या विराट कोहलीसाठी किती तो खटाटोप
वेस्ट इंडिज विरूद्ध न खेळून सुद्धा विराटसाठी करतेय टीम मॅनेजमेंट ही गोष्ट
मुंबई : आगामी टी20 विश्वचषकासाठी आतापासूनच सर्व संघानी तयारी सुरु केली आहे. त्याप्रमाणेच टीम इंडियात देखील तयारी सुरू आहे. टीम इंडियात सतत एक्सपेरीमेंट केले जात आहे. मात्र हे एक्सपेरीमेंट का केले जात आहे? कोणासाठी केले जात आहेत? याबाबत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता एका माजी क्रिकटरने केलेल्या विधानानंतर त्याचे हे कारण समोर आले आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया वेगवेगळे प्रयोग करत आहे. सर्वात जास्त बदल हा ओपनिंगमध्ये दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात जेव्हा सूर्यकुमार यादव कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याच्याआधी ऋषभ पंतनेही रोहितसोबत सलामी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया संघात नवनवीन एक्सपेरीमेंट करत असल्याचे दिसत आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेलने या एक्सपेरीमेंटवर मोठं विधान केलं आहे. टीम इंडिया ओपनिंगमध्ये खूप बदल करत आहे कारण त्याला विराट कोहलीला प्लेइंग-11 मध्ये कसा तरी फिट पाहायचा आहे, असे पार्थिव म्हणाला आहे. एका मुलाखतीत पार्थिव पटेल म्हणाला, हे बदल केवळ विराट कोहलीला प्लेइंग-11 मध्ये बसवायचे असल्यानेच होत आहेत, त्यामुळेच कधी सूर्या तर कधी ऋषभ पंत सलामीला येत आहेत.
विशेष म्हणजे T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने आतापर्यंत केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, दीपक हुडा, ऋतुराज गायकवाड यांना रोहित शर्माचा जोडीदार म्हणून आजमावले आहे.
दरम्यान पार्थिल पटेलच्या या विधानानंतर खरंच टीम इंडिया इतके एक्सपेरिमेंट फक्त विराटसाठी करतेय का असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच इतर खेळाडूंसाठी असे एक्सपेरिमेंट होतील का असाही प्रश्न उपस्थित होतोय.